आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा-देवळाईत मोफत टँकरसाठी मनपा प्रशासनाने मागवली माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातारा-देवळाई वॉर्डांना मोफत पाण्याचे टँकर देण्याचा प्रस्ताव नगरसेवक राजू शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत ठेवला होता. या प्रस्तावाला तत्काळ मंजूर करून महापौर नंदकुमार घोडेले यांनी टँकर देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते. मात्र याबाबत काही काम होत नसून मोफत पाणी मिळणार नसल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन शिंदे यांनी पाठपुरावा करून टँकर देण्यासाठी नियोजन करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला केली. त्यानुसार नगरसेवकांकडून माहिती मागवण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने सुरू केले. 


सातारा-देवळाई वॉर्डांचा मनपात समावेश करून घेतला. त्या प्रमाणात मात्र त्यांना सुविधा देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी नागरिकांना मोफत पाण्याचे टँकर देण्यात यावे असा प्रस्ताव १६ एप्रिल रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शिंदे यांनी ठेवला होता. येथील नागरिकांसाठी हा विषय महत्त्वाचा असल्याने घोडेले यांनी तत्काळ हा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र पाणीपुरवठा विभागाकडून या प्रस्तावावर आठवडाभरात कोणतेच नियोजन करण्यात आले नव्हते. तसेच मोफत पाणी देणे मनपाला परवडणार नसल्याचे मत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्याबाबत दिव्य मराठीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. तसेच त्याचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे शिंदे यांनी तत्काळ महापौर घोडेले आणि मनपा आयुक्त तसेच पाणीपुरवठा अधिकारी सरताजसिंग चहल यांना पत्र दिले होते. त्यात पाणी देण्यासाठी नियोजन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार गुरुवारी सातारा वॉर्डाच्या नगरसेविका सायली जमादार आणि देवळाई वॉर्डाचे नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांना त्यांच्या वाॅर्डातील नागरिकांची माहिती आणि किती टँकर लागेल याची माहिती मागवली आहे. दोन्ही नगरसेवकांनी माहिती देताच टँकर देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.


कॉलनी, टँकरची आवश्यक माहिती 
मोफत टँकर देण्यासाठी व्यवस्थित नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी हा कारभार मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे न देता नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डांतील कॉलनी, परिसर, भाग, नगरांची माहिती देऊन कोणत्या ठिकाणी किती टँकर लागू शकतात याची माहिती दिल्यास त्यानंतर मनपाला टँकर देणे सोपे होणार आहे. त्यावरूनच नियोजन करणे होईल. 


माहिती आल्यावर काढणार टँकर, खर्च, पाण्याची आवश्यकता 
नागरिकांनी द्यावी आपल्या परिसराची माहिती : वॉर्डांमध्ये दोन्ही नगरसेवकांना सर्वच ठिकाणी फिरणे शक्य होऊ शकत नाही. तसेच मनपाची आणि पक्षाची इतर कामे असल्याने अनेक भाग त्यांच्याकडून सुटू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसराची माहिती, लोकसंख्या, घरांची माहिती नगरसेवकांना दिल्यास अधिक गतीने काम पूर्ण होईल. 


उन्हाळा दोनच महिने बाकी 
यंदा दोन महिन्यांचा उन्हाळा संपला आहे. त्यामुळे दोनच महिने शिल्लक असून या दिवसात मनपाला येथे पाणीपुरवठा करणे अवघड नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मी नियमित पाठपुरावा करत आहेत. लवकर पाणी मिळावे म्हणून नगरसेवकांची मदत घेत आहोत. 
- राजू शिंदे, नगरसेवक 


माहिती आल्यावर नियोजन 
 हा भाग नवीन असल्याने आम्ही सुरुवातीला नगरसेवकांची मदत घेऊन माहिती जमा करत आहोत. आपल्याकडील पाण्याची उपलब्धता, टँकर आणि या भागांना आवश्यक पाणी, टँकर याची सांगड घालण्यात येणार आहे. पूर्ण माहिती आल्यावरच त्याचे नियोजन होईल. 
- सरताजसिंग चहल, अभियंता, पाणीपुरवठा

बातम्या आणखी आहेत...