आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपत्याच्या जन्मतारखेत बदल करणाऱ्या ग्रा.पं. सदस्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झाल्याचे सिद्ध झाल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील पद रद्द होते. या कचाट्यातून सुटण्यासाठी तिसऱ्या अपत्याचे वय कमी दाखवण्याचा ग्रामपंचायत सदस्याचा प्रयत्न उघडकीस आला. या प्रकरणी सदस्य, त्याची पत्नी, डॉक्टर व मुख्याध्यापकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.  

   
कोळगावचे (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) अंबादास खंडागळे व त्यांची पत्नी संगीता यांनी ग्रामपंचायत सदस्य पद कायम ठेवण्यासाठी मुख्याध्यापक व डॉक्टरवर राजकीय वजन वापरून तिसऱ्या अपत्याचे वय ३ महिने ५ दिवसांनी कमी दाखवले. ते मान्य करण्यास जिल्हाधिकारी व  अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी नकार दिल्यानंतरही ते त्या विरुद्ध खंडपीठात आले होते. त्यांनी मागितलेली दाद न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी नाकारली. खंडपीठाचा विरोध लक्षात येताच याचिका मागे घेण्याची विनंतीही फेटाळली. तसेच खंडागळे दांपत्य, डॉ. कांबळे तसेच तुकाराम पाटील गडाख विद्यालय हसनपूरचे मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध जन्माचा खोटा दाखला तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले.     


खंडागळे दांपत्यास  अक्षय (जन्म १८ ऑगस्ट १९९७), प्रवीण (१० ऑगस्ट १९९९) व कोमल ( २ सप्टेंबर २००१) अशी तीन मुले आहे. कोमलचा जन्म ७ डिसेंबर २००१ रोजीचा असतानाही या पती-पत्नींनी तो २ सप्टेंबर २००१ दाखवला. त्याकरिता  खोटे व बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप पराभूत उमेदवार अरुण चतरू खंडागळे यांनी केला. आधी २००१ मध्ये संगीता सदस्यपदी निवडून आल्या. २०१० मध्ये त्यांचे पती अंबादास तर  २०१५ मध्ये त्या पुन्हा विजयी झाल्या. त्यामुळे पराभूत उमेदवाराकडे कागदपत्रे उपलब्ध होती. शाळेच्या बोनाफाइड प्रमाणपत्रात तिसऱ्यांदा १८ जून २०१६ रोजी मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र मिळविले. तिन्ही ठिकाणी कोमलचा जन्म २ सप्टेंबर २००१ रोजी झाल्याचे नमूद होते.   मात्र, कांबळे रुग्णालयाच्या आवक जावक रजिस्टरच्या नोंदीत जन्मतारखेचा उल्लेख २ सप्टेंबर २००१ आढळून आला नाही. केवळ रुग्णालयाने निर्गमित केलेल्या प्रमाणपत्रावरच तसा उल्लेख आढळून आला.  

 

शाळेत मूळ नोंद वेगळी   
तिसरे अपत्य कोमलचा जन्म ७ डिसेंबर २००१ रोजी कांबळे रुग्णालयामध्ये झाला तरीही डॉक्टर तसेच शाळेकडून २ सप्टेंबर २००१ रोजी जन्म झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड, शाळेच्या रजिस्टरमध्ये ७ डिसेंबर २००१ची नोंद आहे. अंबादास खंडागळे यांनी खोटी जन्म तारीख असलेले शपथपत्र २३ जुलै २०१५ रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केले. ५ ऑगस्ट २००८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केलेली  जन्म तारखेतील बदलाची जाहिरात जोडली.

 

बातम्या आणखी आहेत...