आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंचभर जमिनीचे संपादन न करता गुरुत्वीय बल, भूमिगत जलवाहिनीद्वारे 519 हेक्टरवरील शेती होणार सुजलाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद - प्रकल्पाच्या कालव्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याची एक इंच जमीनही संपादित न करता थेट त्यांच्या बांधापर्यंत भूमिगत जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचवण्याचा राज्यातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प ३० जूनपर्यंत फुलंब्रीत कार्यान्वित होणार आहे.  विजेचा कोणताही वापर न करता गुरुत्वीय बलाच्या वापरातून आणि केवळ ९.१७ कोटी रुपये खर्च करून अंदाजे १ हजार ८०० शेतकऱ्यांना हे पाणी मिळणार आहे. यासाठी एकूण ३२ किलाेमीटरपर्यंत भूमिगत जलवाहिनीचे जाळे अंथरले जाणार आहे.  गुरुत्वाकर्षण बलाने शेतीला पाणी देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असणार अाहे.


विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ असलेल्या फुलंब्री तालुक्यातील लहानेची वाडी व पाथ्री येथील ५१९ हेक्टरवरील शेतजमिनीच्या सिंचनासाठी बृलपा  प्रकल्प फुलंब्री आकार घेत आहे.  पुण्याच्या एन. एन. के कन्स्ट्रक्शन कंपनीने काम हाती घेतले आहे. या प्रकल्पातून परिसरातील सुमारे १८०० शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली येणार आहे. फुलंब्री नाल्यावरील बांधलेल्या छोट्या धरणातील पाण्यावर ५१० हेक्टर  क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.   पाथ्री तसेच लहानेची वाडी परिसरातील शेती यामुळे सुजलाम सुफलाम  होणार आहे.

 

दरम्यान  ३ ते ४ वर्षांमध्ये हे धरण पूर्ण भरते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:हून प्रकल्पासाठी लागणाऱ्या टाकीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. ३० डिसेंबर २०१७ रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असून, याअंतर्गंत ७३० हेक्टरमध्ये जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही जलवाहिनी ४५ ते ५० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकते. यावर सहायक कार्यकारी अभियंता एम. पी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता आर. एम. जगताप आणि लघु पाटबंधारे विभाग (आैरंगाबाद) येथील अभियंत्यांची टीम  काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. 

 

योजनेवर असेल शेतकऱ्यांचे  नियंत्रण 
शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची सोसायटी तयार करण्यात येणार आहे. तसेच त्यांना पाणी सोडणे, पाण्याचा हिशेब, पाणीपट्टीचा हिशेब, वसुली, देखभाल - दुरुस्ती करावी लागणार आहे. या बाबतचे प्रशिक्षणही एन. एन. के कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गावातील युवक तसेच इच्छुक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कंत्राटदार पाच वर्षे  शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी शेतात पोहोचण्यासाठी काम करणार आहे.

 

विदर्भातूनही अशा प्रकल्पाला मागणी
विदर्भातील वाशीम, चंद्रपूर, वर्धा, नागपूर येथील शेतकऱ्यांनी या कामाची पाहणी करून असा प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात इतरत्र अशा प्रकारचे अनेक प्रकल्प उभारले जातील, अशी अपेक्षा आहे. 

 

असे मिळणार शेतकऱ्यांना पाणी  
धरणाच्या समोरच्या बाजूच्या हेडवरून भूमिगत पाइपलाइन टाकली आहे. तेथील कंट्रोलिंग व्हॉल्व्हद्वारे  नैसर्गिक उताराचा आधार घेत  जलवाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत.   गरजेनुसार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये १० ते १५ फुटांची सिमेंटच्या ५ ते ६ वितरण कुंड बांधून धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे या टाकीत जमा केले जाईल.  गरजेनुसार टाकीतून मोठे - छोटे आऊटलेट  पाइप बसवून शेतकऱ्यांना भूमिगत जलवाहिनीद्वारे पाणी देऊन थेट शेतामध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले. 

 

विना वीज बांधापर्यंत पाणी पोहोचणार
विजेचा कुठलाही वापर न करता शेतकऱ्यांना पाणी देता येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून शेतकऱ्यांना स्वस्तात पाणी देणे सहज शक्य होणार आहे. सरकारी पातळीवर जलदगतीने पूर्ण होणारा मराठवाड्यातील हा पहिला तसेच माझ्या माहितीनुसार गुरुत्वाकर्षण बलाचा वापर करून पाणी वितरण करण्याचा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना केवळ एका वर्षातच पूर्ण होणार आहे.

ए.एम. निंभोरेे,   कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, आैरंगाबाद

 

शेतकऱ्यांना परवडेल असा प्रकल्प 
माझ्या मतदारसंघामध्ये हे काम करून घेण्यासाठी मी आग्रह धरला. फुलंब्रीचे धरण १० ते १२ वर्षांपूर्वी बांधून झाले. परंतु अनेक वेळा धरणात पाणी असूनही ते शेतकऱ्यांना देता येत नव्हते. त्यामुळे मी मुंबईला संबंधित अधिकारी तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या. त्यानुसार  शेतकऱ्यांच्या खिशाला परवडेल अशा खर्चामधून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे काम लवकरच पूर्ण करू. 
हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र

 

पुढील स्‍लाइडवर फोटोंद्वारे समजून घ्‍या, कसा आहे हा प्रकल्‍प... ​

 

बातम्या आणखी आहेत...