आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य महाराष्ट्राचे; महाराष्ट्राची ‘आराेग्यनीती’ बिघडली; बालमृत्यू वाढले, लेकी घटल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या देशात अव्वल महाराष्ट्र प्रमुख आरोग्य निर्देशांकात घसरला आहे. नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्रापेक्षा केरळ, पंजाब, गुजरात या लहान राज्यांनी आरोग्यदायी कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले. विविध आरोग्य घटकांनुसार झालेल्या या सर्वेक्षणात लसीकरण, बालमृत्यू, शेकडा मुलींचे प्रमाण यात महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात त्यात प्रगतीसाठी महाराष्ट्राला ७ घटकांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राने एकूण आरोग्य घटकांत देशात सहावे स्थान कायम राखले आहे. केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. मूळ वर्षाच्या (२०१४-१५) तुलनेत राज्याने सर्वात कमी  प्रगती साधल्याचे अहवालात नमूद आहे.

 

राज्याच्या आरोग्याची चिंता वाढवणारे घटक  

० ते ५ वयोगटांतील बालमृत्यूंचे प्रमाण
मूळ वर्षाशी (२०१४-२०१५) तुलना करता २०१६-२०१७ मध्ये महाराष्ट्रात याचे प्रमाण दरहजारी २३ वरून २४ झाले आहे.

 

मुलींचे प्रमाण
दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. मूळ वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ८९६ वरून ८७८ पर्यंत घसरले आहे.

 

अद्ययावत रुग्णालयात प्रसूती
अशा प्रसूतींचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. मूळ वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ८९.१९ वरून ८५.३०% पर्यंत घसरले आहे.

 

संपूर्ण लसीकरण
या घटकांतर्गत राज्याची प्रगती  वाईट असल्याचे अहवाल सांगतो. यात मूळ वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ९८.५५ वरून आता ९८.२२ टक्क्यांवर आले आहे.

 

२४x७ आरोग्य केंद्रे
यातही महाराष्ट्राची मूळ वर्षाच्या तुलनेत पीछेहाट झाली आहे. तीन वर्षांत हे प्रमाण ४८.०४ वरून ४६.७१ टक्क्यांवर आले आहे.

 

रिक्त पदे 
प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी नियुक्ती आणि जिल्हा रुग्णालयांत स्पेशालिस्टची नियुक्ती यात राज्य मागे आहे.

 

प्रगतीसाठी सप्तपदी
१ बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी  बालकांचे पोषण व आहार याकडे लक्ष देणे आवश्यक  
२ मातांची आरोग्यविषयक जागरूकता  वाढवणे  
३ लसीकरणावर भर देत संपूर्ण लसीकरण साधणे  
४ अारोग्य सेवा जास्तीत जास्त माता, बालकांपर्यंत पोहोचवणे  
५ शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा गावपातळीपर्यंत करणे  
६ आहार, सुविधासाठी गरीब कुुटुंंबांचे उत्पन्न वाढीकडे लक्ष देणे  
७ पायाभूत आरोग्य सुविधा अद्ययावत करणे
बातम्या आणखी आहेत...