आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने कामगारांच्या 4 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कागदपत्रांतील त्रुटींमुळे तहसील कार्यालय रेशन कार्ड देण्यास नकार देत होते. म्हणून रांजणगाव शेणपुंजी येथील कंत्राटी कामगारांच्या मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया तीन वर्षांपासून रखडल्या होत्या. ही बाब लक्षात येताच एका तरुण वैद्यकीय अधिकाऱ्याने सर्व शक्ती पणाला लावली. त्रुटी दूर केल्या. त्याला इतर विभागांचीही साथ मिळाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात चार मुलांवर शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील टप्प्यात आणखी २० मुलांवर शस्त्रक्रिया होणार आहेत.

 
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वर्षातून चार वेळा करतात. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष राठोड यांना रांजणगाव शेणपुंजी येथील कामगारांच्या चार मुलांना तातडीने हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे लक्षात आले. 


रेशन कार्डासाठी प्रयत्न...
मग डॉ. राठोड यांनी स्वत: मोहीम हाती घेत गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. रेशन कार्ड असल्याशिवाय मुलांवर उपचारच होऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे शेळके यांनी गंभीरपणे कार्यवाही केली. 


यांनीही बजावली महत्त्वाची भूमिका 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जी.एम.गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी विनायक भटकर, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा समन्वयक कैलास ताटीकोंडलवार, डॉ. सुनीता चव्हाण, प्रियांका घोडेचोर, शालन मुंडे यांचीही भूमिका महत्त्वाची राहिली.

 
हृदयाला मोठे छिद्र 
दुसऱ्या तपासणीत डॉ. राठोड यांच्या निदर्शनास आले की, या मुलांच्या हृदयाला मोठे छिद्र असून त्याची माहिती त्यांनी मुलांच्या पालकांना दिली तेव्हा त्यांनी रेशन कार्ड नसल्याने उपचार करणे शक्य नसल्याचे सांगितले. 


त्रुटी दूर व्हाव्यात 
कागदपत्रांच्या पूर्ततेत फार वेळ गेला. यापुढील काळात यंत्रणेतील त्रुटी दूर करणे खूपच आवश्यक आहे. - डॉ.संतोष राठोड, वैद्यकीय अधिकारी 


यापुढे काळजी घेऊ 
मुलांना गंभीर आजार असून केवळ रेशन कार्ड नसल्याने उपचार थांबल्याचे डॉ. राठोड यांच्याकडून कळल्यावर तत्काळ कार्यवाही केली. यापुढे असा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ. 
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, गंगापूर

 
एक शस्त्रक्रिया मुंबईत 
आरती ठाकूरवर मुंबईच्या बालाजी रुग्णालयात तर शुभ्रा खंडागळे, विकास कुमार, स्वाती गीतेवर कमलनयन आणि पूनम देशमुखच्या डोळ्यावर दहिफळे रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी हालचाली सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...