आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू शक्ती मोर्चाच्या आयोजनात शिवसेनेने केले रडल्यासारखे, पोलिसांनी केले मारल्यासारखे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जुन्या शहरात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आयोजित केलेल्या हिंदू शक्ती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारूनही आणि जमावबंदी आदेश लागू असतानाही शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शेकडो शिवसैनिक जमले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. तरीही ठरल्याप्रमाणे मोर्चेकरी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने निघाले. मोर्चा सुरू होताच मोर्चेकऱ्यांना अटक केल्याची घोषणा पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून केली तरीही मोर्चेकरी पुढे जात राहिले. पोलिसांनी टिळक पथावरील श्रीमान- श्रीमतीजवळ बॅरिकेड्स टाकून रस्ता अडवला. तेथून मोर्चा सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर वळवला. शिवसेना नेत्यांनी येथेच भाषणेही केली. त्यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना जाऊन भेटले. पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही ठरल्याप्रमाणे आम्ही मोर्चा काढलाच, असा दावा शिवसेनेने केला. तर आम्ही जमावाला पोलिस अधिनियमाच्या कलम ६८ नुसार ताब्यात घेऊन सभु मैदानावर नेले. तेथे कलम ६९ नुसार समज देऊन सोडून दिले, असा प्रतिदावा पोलिसांनी केला आहे. परवानगी नसताना आणि जमावबंदी आदेश लागू असतानाही पैठण गेट ते श्रीमान-श्रीमती हे सुमारे ३०० मीटरचे अंतर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. पोलिसांनी तेथे तो अडवून सभु मैदानावर वळवला. 


सकाळपासूनच पैठण गेटवर गर्दी, घोषणाबाजीही सुरू होती. ताब्यात घेऊन जातानाही मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी मारल्यासारखे केले, शिवसेनेने रडल्यासारखे केले आणि मोर्चा काढला, अशी वस्तुस्थिती होती. प्रक्षोभक भाषणेही झाली. मात्र, पोलिसांनी भारतीय दंड संहितेप्रमाणे कोणावरही गुन्हा दाखल केला नाही. केवळ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायद्यानुसार कलम ६८ मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले आणि घोषणाबाजी आणि भाषणाची परवानगी देत सभु मैदानावर नेण्यात आले. सभा झाल्यानंतर सगळ्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. 


या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, संजय शिरसाट, बाळू थोरात, विकास जैन, बंडू ओक, अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अनुचित प्रकार होऊन शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता. राज्य राखीव पोलिस दलाच्या ७ तुकड्यांसह, वज्र, वरुण, दंगा काबू पथक यांच्यासह सुमारे हजार पोलिसांचा ताफा या वेळी उपस्थित होता. उपायुक्त विनायक ढाकणे आणि राहुल श्रीरामे यांनी पैठण गेटपासून निघालेला मोर्चा एसबी शाळेच्या मैदानावर नेला, तर डॉ. दीपाली धाटे घाडगे या गुलमंडी रस्त्यावर श्रीमान श्रीमतीसमोर फौजफाटा घेऊन उभ्या होत्या. मोर्चेकरी कुठल्याही परिस्थितीत गुलमंडीच्या दिशेने जाणार नाहीत ही जबाबदारी या पथकाकडे होती. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे हे पैठण गेट येथील परिमंडळ एकच्या कार्यालयात बसून आढावा घेत होते. दीडच्या सुमारास या मोर्चाची सांगता झाली आणि मोर्चेकरी शांततेत परतले. 


शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ
या मोर्चासाठी शिवसेनेने मुंबईचे आचार्य जितेंद्र महाराज, उस्मानाबादचे वारकरी संप्रदायाचे बोधले महाराज आणि शहरातील श्री संप्रदायाचे इंगे पाटील यांना बोलावले होते. आणखी एक हिंदुत्ववादी पक्ष आम्ही हिंदूचे रक्षण केले, असे सांगतो आहे. मात्र, त्या रात्री कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे नेते फक्त फोटो काढत राहिले. आम्ही तुम्हाला मदत, सहकार्य केले. तुम्ही आमच्या पाठीशी राहा. नाही तर हळूच तुम्ही दुसरीकडे जायचे, असे करू नका बाबांनो, ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही, वाचवले नाही त्यांच्या नादी लागू नका बाबांनो, असे हात जोडून सांगत खैरे यांनी २०१९ च्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. अटकेतील शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, लक्ष्मीनारायण बाखरिया यांची लवकर सुटका करू, असे शिवसेना नेत्यांनी सभेत जाहीर केले.  


मोर्चाचा पोलिस तपासावर फरक पडणार नाही 
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांना विचारले असता मोर्चा काढण्यातच आला नाही. मोर्चा निघताच सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले. ज्या ठिकाणी जायचे होते ते जवळ असल्यामुळे गाड्यांचा वापर केला नाही. याचा तपासावर काहीही फरक होणार नाही, पोलिस पुराव्यांच्या आधारावर काम करत आहे, असे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. 
दंगलीविरोधातील मोर्चाआडून शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ, खैरे म्हणाले : आम्ही तुमचे रक्षण केले, वेळ आल्यावर आम्हाला सोडून दुसरीकडेच जाऊ नका! 


अचानक बदलला मार्ग 
विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचे नियोजन होते. आपण किमान गुलमंडीपर्यंत तरी जाऊ, असे मोर्चेकऱ्यांना वाटले होते. त्यापूर्वीच श्रीमान श्रीमतीसमोर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता. खैरे येताच त्यांना सभु मैदानावर जायचे असल्याची कल्पना दिली. त्यानुसार अचानक मार्ग बदलला आणि सरस्वती कॉलनीतून मोर्चेकऱ्यांना सभु मैदानावर नेण्यात आले. गुन्हे दाखल होण्याची भीती आणि उन्हामुळे अनेक मोर्चेकरी अर्ध्यातूनच निघून गेले. 


पोलिसांच्या मते अडीच हजार मोर्चेकरी 
पोलिसांच्या मते मोर्चात अडीच हजार लोकांचा सहभाग होता, तर दहा ते बारा हजार लोक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. मोर्चाच्या वेळी पैठण गेट, टिळक पथावरील सर्व दुकाने बंद होती. अनेक तरुणांनी लच्छू पहिलवान आणि राजेंद्र जंजाळ यांचे कागदी मास्क चेहऱ्यावर लावून मोर्चात सहभाग घेतला होता. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...