आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांनी डाॅ. भापकर यांची बदली रद्द; विरोधी नेत्यांचा बदलीसाठी आग्रह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भाजपचे स्थानिक पदाधिकारी, आमदार, मंत्र्यांपासून ते थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मागणी केल्यानंतर अखेर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली सोमवारी रद्द करण्यात आली. शहरातील विरोधी राजकारणी तसेच मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत डॉ. भापकर यांची बदली करवून घेतली होती, अशी माहिती समोर येते आहे. अर्थात, यामागे इनामी जमिनीचेच व्यवहार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.  नियम बाजूला ठेवून इनामी जमीन विक्रीला परवानगी दिल्याप्रकरणी डॉ. भापकर यांनी निवासी जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कटके यांनी डॉ. भापकर यांच्याविरोधात तक्रार देत पुढे न्यायालयातही धाव घेतली. तेव्हापासून औरंगाबादमधील इनामी आणि अन्य जमिनींच्या व्यवहारांची चर्चा सुरू होती. या प्रकरणात मोठी लॉबी कार्यरत असून तिला स्थानिक विरोधी राजकीय नेत्याचा पाठिंबा असल्याचेही म्हटले जात होते. सत्ताधारी पक्षातील कोणत्याही स्थानिक नेत्याला विश्वासात न घेता भापकरांची बदली झाल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले होते.   


या वेळी कोणाला विचारलेच नाही  
डॉ. भापकर यांची बदली होईपर्यंत याची कल्पना भाजपमधील अन्य कोणालाही नव्हती. दरवेळी संबंधित जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्याची बदली करायची असेल तर मुख्यमंत्र्यांकडून संबंधित आमदार, मंत्री, पक्षाध्यक्ष यांना विश्वासात घेतले गेले आहे. या वेळी मात्र कोणाशीही न बोलता भापकर यांची बदली झाली. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेतेही आश्चर्यचकित झाले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यावर त्यांनी बदली रद्द केल्यामुळे आता या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

कशामुळे बदली ?

एक माजी आमदार व पुन्हा निवडणूक लढवण्याच्या पवित्र्यात असलेले काँग्रेस नेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी नातेवाईक तसेच मित्रांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर इनामी जमिनी खरेदी केल्या आहेत. यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. उपजिल्हाधिकारी पदावर कोणतीही व्यक्ती आली की त्यांचे संबंध या लॉबीसोबत लगेच जुळतात. कारण जमिनीच्या खरेदीत ओढ असलेल्या या लॉबीला असेच अधिकारी हवे असतात. दुसरीकडे याच अधिकाऱ्यांच्या मदतीने मंत्रालयात सचिव पदावर असलेल्या काहींनी नातेवाइकांच्या नावे औरंगाबाद जिल्ह्यात शेकडो एकर इनामी जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यांचा भंडाफोड व्हायची भीती असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे जमीन खरेदीदार राजकारणी आणि मंत्रालयातील काही सचिव मंडळी कामाला लागली. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रारी करत डॉ. भापकर यांची औरंगाबादेतून बदली करणे कसे गरजेचे आहे हे पटवून दिले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या फडणवीस यांनी लगेच बदलीच्या यादीत डॉ. भापकर यांच्या नावाचा समावेश केला.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...