Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Aurangabad Voilence... Rajendra Janjal Arrested By Police

औरंगाबाद दंगल..शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांना अटक, MIMचे फेरोज खान पोलिसांना शरण

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 16, 2018, 10:34 AM IST

शहरातील मोतीकारंजा, राजाबाजार आणि शहागंजमध्ये शुक्रवार, शनिवारी उसळलेल्या दंगलीप्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ या

 • Aurangabad Voilence... Rajendra Janjal Arrested By Police

  औरंगाबाद - शुक्रवारी रात्री शहरात उसळलेल्या दंगलीत सहभागी होऊन इतरांची सुरक्षा धोक्यात आणल्याचा ठपका ठेवत शिवसेनेचा शिवाजीनगर वॉर्डाचा नगरसेवक राजेंद्र जंजाळला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी सकाळी दहा वाजता मोठा फौजफाटा घेऊन पोलिस जंजाळच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचले. हा प्रकार समजताच अर्ध्या तासात जंजाळच्या घरासमोर महिला, तरुण कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. दीड तासाच्या चर्चेनंतर जंजाळ स्वत: पोलिसांसोबत जाण्यास तयार झाला. तो अपार्टमेंटच्या खाली येताच कार्यकर्त्यांनी खांद्यावर बसवून घोषणा देत अंबादास दानवे यांच्या गाडीत बसवले व नंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेले.


  पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दंगलीच्या चौकशीसाठी सोमवारी 50 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष पथक (एसआयटी )स्थापन केले. पथकाने सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ, छायाचित्रांची पाहणी करून दंगेखोरांवर कारवाई सुरू केली. मंगळवारी रात्रीपर्यंत 33 जणांना अटक केली तर अनेकांची चौकशी सुरू होती. सोमवारी दिवसभर विविध पक्ष, संघटनांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते जाळपोळ करताना, दुकाने फोडतानाचे व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. चौकशीत जंजाळचे नाव समोर आल्यानंतर सकाळी दहा वाजता सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, सी. डी. शेवगण, निरीक्षक अविनाश आघाव, श्रीकांत नवले नगरसेवक राजेंद्र जंजाळच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी गेले. तुम्हाला पोलिस आयुक्तांनी बोलावले आहे, असे पोलिसांनी जंजाळला सांगितले. तेव्हाच जंजाळला आपणास अटक होणार याचा अंदाज आला होता. ही बाब बाहेर वाऱ्यासारखी पसरताच महिला, तरुण कार्यकर्त्यांची गर्दी जमायला लागली आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा अंदाज पोलिसांना आला. उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे दोघेही जंजाळच्या निवासस्थानी गेले.


  या वेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाप्रमुख अंबादास दानवेही तेथे आले. कार्यकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. एसआरपीएफच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी जंजाळला घेऊन जाण्यास विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी सुमारे दीड तास जंजाळच्या घरात चर्चा केली. चर्चेनंतर साडेअकराच्या सुमारास जंजाळने स्वत: पोलिस ठाण्यात येण्याची तयारी दाखवली. या वेळी निरीक्षक आघाव वगळता सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी निवासस्थान सोडले. त्यानंतर अपार्टमेंटच्या खाली येताच घोषणांसह कार्यकर्त्यांनी जंजाळला खांद्यावर उचलले आणि बाहेर आणले. दानवे यांच्या गाडीमध्ये बसून जंजाळ क्रांती चौक पोलिस ठाण्याकडे निघाला. परंतु घरासमोर आलेल्या सर्व जमावाने मिळेल त्या गाडीत बसून क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. बारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जमाव बाहेर बसून होता. साडेतीन वाजता जंजाळला अटक केल्याचे जाहीर करण्यात आले. पोलिसांनी जंजाळला मेडिकल तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेऊन न्यायालयात हजर केले.


  जंजाळला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी
  राजेंद्र जंजाळविरुद्ध गु. र. नं. 86-2018 भादंवि कलम 143, 147, 148, 149, 436, 435, 427 नुसार गुुन्हा दाखल झाला असून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी शुक्रवारपर्यंत (18 मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षाच्या वतीने पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.


  जिन्सी राजाबाजार रोडवरील भारतीया दवाखान्यासमोरील कप्तान अॉटो पेंट्स दुकानाचे महंमद शोएब अब्दुल मुनाफ (28 ) यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 13 मे 2018 रोजी सायंकाळी 6.33 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. जिन्सी-राजाबाजार रोडला कप्तान अॉटो नामक पेंटचे दुकान माझा भाऊ अठरा वर्षांपासून चालवत असल्याचे फिर्यादीत नमूद केले. अकरा मे रोजी रात्री 9 वाजता दुकान बंद करून गेल्यानंतर शनिवारी 12 मे रोजी माझा मित्र मोहंमद अनिस याने संस्थान गणपती परिसरात दोन गटात भांडणे सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे बाल्कनीतून पाहिले असता जाळपोळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. रात्री 1.30 वाजता राजाबाजारकडून सात ते आठ अनोळखी लोक आले. त्यांच्यापूर्वी पोलिसवाले येऊन निघून गेले.

  नागरिकांच्या हाती लाठ्याकाठ्या होत्या. त्यांनी रिक्षा, कार आदींचे नुकसान केले. पेट्रोल बाटल्या टाकून पेटवून दिल्या. लोक आक्रमक असल्याने खाली आलो नाही. यात दुकानातील पेंट पावडर व सामानाचे आठ लाख व कारचे दहा लाखांचे नुकसान झाले. इलेक्ट्रिक दुकान 25 लाख व इतर सात लोकांच्या वाहनांची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

  दंगलीत 10 कोटी 21 लाखांचे नुकसान
  शहरात शुक्रवार व शनिवारी झालेल्या दंगलीत घरे, दुकाने व वाहनांचे 10 कोटी 21 लाख 15 हजार 600 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूलच्या पथकाने केला आहे. 64 वाहनधारकांच्या जबाबानुसार नुकसान 1 कोटी 27 लाख 73 हजार 500 तर 75 घर व दुकानदारांच्या जबाबानुसार 8 कोटी 93 लाख 42 हजार 100 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पाच पथकांनी घेतली आहे.

  पुन्हा तणाव
  जंजाळला अटक होताच शिवाजीनगर भागात सर्वात आधी बाजारपेठ बंद करण्यात आली. ही बातमी हळूहळू सर्वत्र पोहोचताच तणाव निर्माण झाला. राजाबाजार, टीव्ही सेंटर, सिडको, गुलमंडी व वाळूजमधील काही भागातील बाजारपेठा बंद झाल्या. जंजाळला न्यायालयात नेतानासुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


  दुपारी तीन वाजता पोलिसांना न सापडलेल्या फेरोज खानला आमदार जलील यांनी सहा वाजता केले पोलिसांच्या हवाली
  दंगलीतील दुसरा आरोपी व एमआयएमचा विरोधी पक्षनेता फेरोज मोईनोद्दीन खानने (37, रा. बनेमियाँ दर्गामागे, निजामोद्दीन रोड, बुक्कलगुडा) मंगळवारी दुपारी स्वत:हून पोलिसांसमोर शरणागती पत्करली. दीपक मन्नालाल जैस्वाल (68) यांचा शहागंज भागात चंदन बिअर बार व जुने घर आहे. चारशे ते पाचशे दंगेखोरांसह खानने त्यांचे बिअर बारचे गोडाऊन फोडून, दारूच्या बाटल्या फोडून बार पेटवून दिला. यात त्यांचे घरही जळाले. त्यावरून त्यांनी ७५ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार सिटी चौक पोलिस ठाण्यात दिली.

  मंगळवारी सकाळपासून विशेष तपास पथकाचे पोलिस फेरोज खानचा शोध घेत होते. दुपारी तीनच्या सुमारास घरी पथक धडकले. मात्र तो पोलिसांना सापडला नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व पदाधिकारी फेरोज खानला घेऊन सिटी चौक पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी फेरोज खानला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळी सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. रात्री साडेसात वाजता खानला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या घराबाहेर गोंधळाचे फोटो...

 • Aurangabad Voilence... Rajendra Janjal Arrested By Police
 • Aurangabad Voilence... Rajendra Janjal Arrested By Police
 • Aurangabad Voilence... Rajendra Janjal Arrested By Police
 • Aurangabad Voilence... Rajendra Janjal Arrested By Police
 • Aurangabad Voilence... Rajendra Janjal Arrested By Police

Trending