आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दंगलीमुळे \'डिजिटल इंडिया\'चा बोजवारा; आर्थिक व्यवहार ठप्प, बँकांवर अतिताण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नोटाबंदीनंतर सरकार ऑनलाइन व्यवहारांना चालना देत असली तरी औरंगाबादेतील दोन दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलीनंतर बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवेमुळे इंटरनेट बँकींगचा बोजवारा उडाला आहे.

 

इंटरनेट बँकींग आणि मोबाइल अॅपद्वारे बटने दाबताच पैशांची देवाण घेवाण करण्याच्या सवयीला शनिवारपासून चांगलाचा ब्रेक लागला. यामुळे ग्राहकांचे बँकांचे हप्ते बाऊन्स होणार आहेत. तर पेट्रोलसाठी नगदी पैसे नसल्याने ग्राहकांवर गाड्या ओढण्याची वेळ आली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्या कारणाने त्याचा ग्राहक सेवेला फटका बसल्याने शहराची अघोषित आर्थिक नाकेबंदी झाली आहे.

 

पेट्रोल पंपांवर फक्त नकद
शहरातील 41 पेट्रोल पंपांवर पीओएस मशिनीने डेबीट किंवा क्रेडीट कार्डाद्वारे पैसे घेतले जातात. पैकी 96 टक्के पंपांवरील पीओएस सीम कार्डावर चालतात. तर उर्वरीत पीओएस पंपांच्या कार्यालयात ब्रॉडबँडशी जोडलेले असतात. आज सीम कार्डावर चालणाऱ्या तब्बल 37 पंपावरील तब्बल 110 पीओएस मशीनी बंद असल्याने येथे नकदीनेच व्यवहार झाले. एकीकडे एटीएममध्ये नकद नाही तर दुसरीकडे पंपांवर कार्ड बंद अशा दुहेरी स्थितीत ग्राहक फसला. यामुळे जेथे कार्ड चालतात अशा चुन्नीलाल, एन.ए.प्रिंटर, राज पेट्रोलपंप, भवानी पेट्रोलपंप अशा मोजक्याच ठिकाणी कार्डधारकांच्या रांगा लागल्या होत्या.

 

ईएमआय बाऊन्स होणार
बहुतांशी कर्जाचे हप्ते 1 ते 15 तारखेदरम्यान येतात. अनेक ग्राहक हप्त्याच्या 2-3 दिवस आधी बँकेत रक्कम जमा करतात. आज खात्यात रक्कम टाकण्यासाठी ग्राहक बँकांत गेले असता त्यांना पावती देण्यात आली, परंतू रक्कम जमा होईल किंवा नाही, याची खात्री देण्यात आलेली नाही. ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांच्या मनसुब्यावर तर पाणी फेरले गेले. इंटरनेटच बंद असल्याने इंटरनेट बँकींग, अॅपद्वारे ट्रान्सफर पूर्णपणे बंद राहिले. एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएसही बंद होते. यामुळे यंदाचा इएमआय बाऊन्स होण्याच्या धास्तीने ग्राहक त्रस्त झालेले दिसले. आज इंटरनेट बंदीची 48 तासांची मुदत संपणार असल्याने आम्ही निर्धास्त होतो. सकाळी 11 नंतर ट्रान्सफर करू, असे वाटले. मात्र, नेट बंद असल्याने शक्य नाही झाले. वाट बघण्यात बँकेत पैसे भरण्याची वेळही निघून गेली, असे होम क्रेडीट फायनान्समधून मोबाइलसाठी कर्ज घेतलेले सचिन कुलकर्णी म्हणाले. शहागंज भागातील बँक ऑफ महाराष्ट्रने सकाळपासूनच शटर खाली ओढले होते. (फोटो उपलब्ध नाही) इंटरनेट बंद असल्याने व्यवहार बंद ठेवल्याचे सांगण्यात येत होते.

 

एटीएमवर अतिताण...
शहरात विविध बँकांचे 490 एटीएम आहेत. एका खासगी बँकेचे ब्रान्च ऑफीसर उन्मेश पुंड म्हणाले, एटीएम ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने चालतात. ऑफलाइन एटीएम बंद पडल्यावर शाखेला सांगितले तर लगेच सुरू होतात. तर ऑनलाईन एटीएम उपग्रहाद्वारे संचलित होतात. यासाठी इंटरनेट लागते. हे इंटरनेट ब्रॉडबँडद्वारेच असते. तर काही ठिकाणी वायफायवर एटीएमचे सर्व्हर चालतात. 490 पैकी तब्बल फारतर 130 एटीएम वायफायवर होते. ते पूर्णपणे बंद राहिले. तर उर्वरीत एटीएम सुरू होते. मात्र, दंगलग्रस्त भागातील एटीएम पूर्णपणे बंद असल्याने तेथील लोड उर्वरीत एटीएमवर आला. यामुळे अनेक ठिकाणी कॅश संपल्याचे चित्र होते.

 

80 टक्के पीओएस बंद
डेबीट किंवा क्रेडीट कार्डाद्वारे पेमेंट करण्यासाठी पीओएस मशीनचा वापर केला जातो. हे मशीन सीमकार्ड किंवा ब्रॉडबँडवर चालतात. आज सीमकार्डावर चालणारे 80 टक्के मशीन बंद होते. यामुळे बाजारातील व्यवहार ठप्प झाले होते. दंगलीची परिस्थिती लक्षात येत नसल्याने हातात रोख असावी यासाठी व्यापारी रोखीनेच पैसे मागतांना दिसले.

 

एसएमएस बंदचा फटका
शहरात निवडणूका नसल्याने बल्क एसएमएसची फारशी गरज पडत नाही. तरी काही कॉर्पोरेट क्लायंट ऑफरची माहिती देण्यासाठी एसएमएस पाठवतात. मात्र, शहरातील परिस्थतीच खराब असल्याने व्यावसायिक याचा वापर करण्याची शक्यताही नव्हती, असे इग्नायटींग माईंडसेच एव्हीपी रोहित अभ्यंकर म्हणाले. मात्र, एसएमएस सेवा असती तर कदाचित राजकरण्ण्यांनी त्याचा वापर करून शांततेचे आवाहन केले असते. पण एसएमएस नसल्याने बँकेचे बॅलेन्स समजणे, इमएमआयचे माहिती देणारे मेसेज आले नाहीत. याचा निश्चितच ग्राहकांना त्रास झाला असेल, असे अभ्यंकर यांनी सांगितले.

 

पेटीएमचे व्यवहार ठप्प
पेटीएममधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मते शहरात दररोज किमान 12 ते 15 हजार व्यवहार पेटीएमद्वारे होतात. यात अगदी भाजीवाल्यापासून किराणा, दूधवाले, पेट्रोल आदीचा समावेश आहे. आज हे सर्वच व्यवहार ठप्प्प झाले होते. यामुळे खात्यात पैसे असतांनाही लोकांना खर्च करता येत नव्हते.

 

ऑनलाइन रिचार्जही बंद
विविध सॅटलाईट चॅनेल, मोबाइल रिचार्ज हे ओटीपी जनरेट करून केले जातात. तर यासाठी डेबीट, क्रेडीट कार्डाद्वारे पैसे अदा केले जातात. अशा व्यवहारांवर मर्यादा आली. अनेकांनी जुन्या पद्धतीने दुकानात जाऊन रिचार्ज केले. आता फिजीकल रिजार्च केवळ 10 टक्केच उरले आहे. हे पहिल्याच दिवशी संपले. आता कूपनद्वारे रिचार्जही उपलब्ध नसल्याने ग्राहक परत पाठवाले लागल्याने ज्योतीनगरातील एसएस मोबाइलचे संचालक जुनैदभाई यांनी सांगितले.

 

डिजीटल इंडियाचा असाही त्रास झाला
'आम्हाला व्यवसायासाठी मोंढ्यातून माल भरायचा होता. तेथे होलसेलरचे पीआेएस बंद असल्याने तो रोख मागत होता. मोंढा, चेलीपूरा, शहागंज भागातील एटीएम बंद असल्याने अमरप्रीत हॉटेलजवळ पोहचलो. तेथे ओव्हरलोड आल्याने एटीएम बंद होते. अखेर काल्डा कॉर्नर परिसरातून पैसे काढून माल घ्यावा लागला. डिजीटल इंडियाचा असा त्रास सहन करावा लागला.'
-राधिका कुलकर्णी, संचालिका, अलका गृह उद्योग

बातम्या आणखी आहेत...