आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Interview Of MLA Imtiyaz Jaleel On Aurangabad Riot, औरंगाबादच्या दंगलीवर काय म्हणाले आमदार इम्तियाज जलील

तुमच्या दृष्टीने दंगलीचे नेमके कारण काय? आमदार इम्तियाज जलील यांची उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 आमदार इम्तियाज जलील म्हणाले, मी विदेशात जाण्यापूर्वी माझ्याकडे शहागंजात ४० वर्षांपासून व्यवसाय करणारे सुमारे ३० हिंदू-मुस्लिम व्यापारी आले होते. लच्छू पहिलवान त्रास देतोय, पहिलवानाचा भाऊ हप्ते मागतोय. हप्ता दिला नाही तर बघून घेईन अशी धमकी देतो. आम्ही मनपाचे कर भरत असताना त्याला पैसे का द्यावे, असा त्यांचा सवाल होता. तेव्हाच येथे गडबड होईल, अशी शंका मला आली होती. दुसरे कारण म्हणजे प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, तरविंदरसिंग धिल्लन यांनी बीबी का मकबऱ्याच्या मागील वक्फ बोर्डाच्या जागेवरील मशीद पाडून जागेचे सपाटीकरण केले. त्याचाही राग होताच.


प्रश्न : हप्ते वसुलीवरून दंगल झाली?
उत्तर - होय, याच मुद्द्यांवरून ही दंगल झाली.


प्रश्न : तुमचे नगरसेवक फेरोज खान यांनीही याच व्यापाऱ्यांकडून पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे काय?
> आमचा नगरसेवक असे करत असेल, असे मला वाटत नाही. परंतु जर पुरावा असेल तर कारवाई झाली पाहिजे.


प्रश्न : तुम्ही मुद्दाम विदेश दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे...
>मुळीच नाही. माझा दौरा खूप आधी ठरला होता. मुलाच्या शिक्षणाचा विषय होता. कुटुंबासह जाण्याचे आधीच ठरले होते.


प्रश्न - गडबडीचा अंदाज आल्यानंतर हा दौरा रद्द का केला नाही?
> गडबड होईल, असे अपेक्षित होते ते मीनाबाजारच्या मुद्द्यावरून. म्हणजेच रमजानमध्ये हा वाद होण्याची शक्यता होती. तोपर्यंत मी दौऱ्याहून परतणार होतो. त्यामुळे दौरा रद्द केला नाही. परंतु गडबड झाल्याचे समजताच परत आलो. परतण्यापूर्वीच फोनवरून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.


प्रश्न - नळ तोडणीचे कारण आहे काय?
> अनधिकृत नळ तोडणी, हे यामागील कारण अजिबात नाही. नळ तोडण्यावरून गांधीनगरात वाद झाला होता आणि तो मिटलाही होता. तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती तर राजाबाजार येथील वातावरण तापले नसते.


प्रश्न - जाळपोळ व दंगल कोणी केली?
> जमावाने ठरावीकच दुकाने जाळली. कोणाची दुकाने जाळायची, हे ठरले होते. का जाळायची, याची माहिती होती. त्या दुकानांसाठीच धमकी देण्यात आली होती.


प्रश्न - तुम्हाला लच्छू पहिलवानाचे नाव घ्यायचे आहे?
> होय. त्यानेच तर येथील व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे पहिलवान यानेच जाळपोळ केली. पोलिसांसमक्ष जाळपोळ झाली, याचे आमच्याकडे पुरावे आहेत.


प्रश्न - मुस्लिमांंच्या बाजूने पेट्रोल बॉम्ब, मिरची पूड, गुलेर आदी साहित्य आढळून आले तरी तुम्ही म्हणता दंगल लच्छू पहिलवान यानेच घडवली.
>जे साहित्य सापडले असे तुम्ही म्हणता ते पानदरिब्यात फोडलेल्या एका मुस्लिमाच्या दुकानातील होते. हे दुकान लच्छू पहिलवानचा गड असलेल्या भागात आहे. त्यामुळे ते साहित्य कोणाच्या हाती लागले असेल, हे तुम्ही समजू शकता.


प्रश्न - पेट्रोल बॉम्ब एका दिवसात तयार होतो का?
> बरोबर आहे. तयारी आधीच झाली होती. पण ती कोणी केली, हा तपासाचा भाग आहे.


प्रश्न - ही दंगल म्हणजे  शिवसेना व एमआयएमचा निवडणूक फंडा नव्हे काय?
> अजिबात नाही, आम्हाला निवडणुकीसाठी अशा गोष्टी करण्याची गरज नाही. आणि काँग्रेस, राष्ट्रवादीने काहीही प्रयत्न केले तरी येथील मुस्लिम हे एमआयएमसोबतच आहेत.


प्रश्न - दंगलीसाठीच लच्छू पहिलवानला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला?
> असू शकते, कदाचित त्यांना तशी गरज वाटली असावी. त्यामुळे शिवसेनेची भाषा बदलली आहे. आम्ही बघून घेऊ, वगैरेची भाषा त्यामुळेच केली जाते. अशी भाषा वापरण्याची ही वेळ नाही. तेल टाकले तर दंगल वाढेल.


प्रश्न - कोण करतेय अशी भाषा?
>खासदार चंद्रकांत खैरेच म्हणतात, मी हिंदूंचे रक्षण करणार. ते खासदार आहेत तेव्हा माझेही ते खासदार आहेत. माझ्याही संरक्षणाची जबाबदारी त्यांचीच आहे. परंतु ते दंगलीचा भाषा करताहेत. हिंदू असो की मुस्लिम, त्यातील एक टक्का घटकांना दंगल हवी असते. ९९ टक्के लोकांना शांतता. अशा वेळी खैरेंनी समाजात चांगला संदेश देण्याची गरज आहे. ते उलटे करताहेत. खरेतर शहागंज येथे २२ दुकाने जळाली. ती दुकाने आम्ही पुन्हा बांधून देतोय. त्यात हिंदूही आहेतच. गुलमंडीवरील मुस्लिमाचे जे दुकान जळालेय ते बांधून देऊन शिवसेनेनेही समाजात चांगला संदेश द्यावा.

 

प्रश्न - लच्छू पहिलवानइतकाच फेरोज खानही दोषी आहे ?
> मी त्याला ओळखतो. तो चिल्ला-पुकारा तेवढा करतो. परंतु थेट हल्ला वगैरे करेल असे मला वाटत नाही. तरीही त्याला अटक झाली. पोलिस तपासात समोर येईल.


प्रश्न - दंगलीचा अंदाज तुम्हालाही आला होता. रोखण्याचे प्रयत्न का केले नाहीत?
> प्रयत्न काय करणार? मीना बाजाराच्या वेळी वाद होईल आणि तो सक्षमपणे मिटवू असे मला वाटले होते. कारण येथे सध्या १०० दुकाने आहेत. रमजानच्या काळात दुकानांची संख्या दुप्पट होते. हप्त्यावरून वाद होतील, असे वाटले होते. रमजानच्या दिवसांत दुकानांची संख्या आणि आपोआपच हप्त्यांची संख्या वाढणार हे पक्के होते. येथे पोलिसही हप्ता घेतात. कदम नावाचा पोलिस दररोज १५० रुपये घेतो, अशी माहिती माझ्याकडे आहे. 


प्रश्न - दंगल झाली तरी शहराला पोलिस आयुक्त मिळाला नाही...
>आता मी जाऊन मुख्यमंत्ऱ्यांना सांगू का की हे शहर संवेदनशील आहे. गुप्तचरांनी येथे वाद होण्याचे संकेत अहवालात दिलेत. तरीही त्यांनी काहीही केले नाही. त्यांना बहुतेक हे शहर अशांतच हवे आहे.


प्रश्न - उद्या शिवसेनेचा मोर्चा आहे.
>तिकडे दंगलीत मैत्री होती अन् दोनच दिवसांत आता पोलिसांवर विश्वास नसल्याचे म्हणताेत. फुटेजमध्ये सेना नेते दिसताहेत अन् पुन्हा मोर्चे काढताहेत. दिशाभूल करण्यासाठीचे हे नाटक आहे.


प्रश्न : दंगल पूर्वनियोजित होती का?
> असू शकते. पण एवढी मोठी दंगल होईल, असे वाटले नव्हते. पण ही दंगल फक्त शहागंज, राजाबाजार, नवाबपुरा याच भागात मर्यादित राहिली. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. जाळपोळ मात्र पूर्वनियोजित होती, हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण शहागंजात ज्या दुकानांवरून आधीपासून वाद होते. तीच जाळण्यात आली. बाजूच्या दुकानाला काहीही होत नाही आणि फक्त मधलेच दुकान कसे जळते? त्यामुळे दंगल पूर्वनियोजित असू शकते जाळपोळ मात्र पूर्वनियोजितच होती

बातम्या आणखी आहेत...