आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये आमचे रुग्णालय चालवायचे तर फक्त तुम्हालाच सोपवू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानला निमंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 'खर्चापुरताच पैसा कमवायचा' हे तत्त्व सामूहिक आणि वैयक्तिक पातळीवरही अंगीकारल्यामुळे औरंगाबाद शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानला, (हेडगेवार रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला) तब्बल तीन हजार किलोमीटर्स अंतरावर आसाममध्ये ३०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारून चालवण्याचे आमंत्रण आले आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने अर्थात, ओएनजीसीने हे आमंत्रण दिले असून ५० एकर क्षेत्रावर रुग्णालय उभारणीला प्रारंभही झाला आहे.

 

आसाममध्ये ओएनजीसीचा मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे तिथेच 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' निधीतून मोठे रुग्णालय उभारण्याचा निश्चय केद्र शासनाच्या या महामंडळाने केला होता. मात्र, हे रुग्णालय चालवण्यासाठी 'योग्य' व्यवस्थापनाची त्यांना गेल्या आठ वर्षांपासून प्रतीक्षा होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वैद्यकीय व्यवस्थापनांचे प्रस्तावही त्यांनी मागवले होते. पण कार्यपद्धती पटत नसल्याने त्यांनी रुग्णालय उभारणी सुरू केली नव्हती. मात्र, महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये सेवाभावी तत्त्वावर एक मोठे रुग्णालय यशस्वीरीत्या चालवले जाते आहे, हे समजल्यावर ओएनजीसीने आसाममध्ये शिवसागर येथे रुग्णालय चालवण्याबाबत प्रस्ताव दिला आहे.

 

सर्व कसोट्यांवर झाले सिद्ध : ओएनजीसीला केवळ माहिती मिळाली आणि त्यांनी प्रस्ताव दिला असे झाले नाही. महामंडळाने आधी या प्रतिष्ठानकडून त्यांच्या हेतूची अभिव्यक्ती करणारे निवेदन मागवले. त्यात तथ्य वाटल्यावर १० तज्ज्ञांचे एक शिष्टमंडळ औरंगाबादला पाठवले. या शिष्टमंडळाने हेडगेवार रुग्णालयाची पाहाणी तर केलीच पण डॉक्टर्स, अन्य कर्मचारी यांच्या मुलाखती घेतल्या आणि हिशेबही तपासले. त्यानंतर प्रतिष्ठानच्या हेतूविषयी त्यांची खात्री झाली. त्यानंतर महामंडळाने प्रतिष्ठानकडून प्रकल्प अहवाल मागवला. तो बनविण्यासाठी पीसीडब्ल्यू या कंपनीने २२ लाख रुपये शुल्क मागितले. ते देण्याची तयारीही ओएनजीसीने दाखवली. पहिल्या टप्प्यात त्यातील ११ लाख रुपये प्रतिष्ठानला पाठवले. मात्र, प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी रुग्णालयाचे काम जाणून घेताना एक रुपयाही न घेता प्रकल्प अहवाल बनविण्याची तयारी पीसीडब्ल्यूने दाखवली. केवळ अधिकाऱ्यांच्या प्रवासाचा खर्च तेवढा घेतला. त्यामुळे ११ लाखातले केवळ साडेतीन लाख रुपये खर्च झाले. उर्वरित रक्कम प्रतिष्ठानने ओएनजीसीला परत केली. त्यानंतर ओएनजीसीच्या पथकाने सांगून टाकले की, आसाममधले आमचे नियोजित रुग्णालय चालवायचे असेल तर ते फक्त तुम्हालाच दिले जाईल.

 

औरंगाबाद मॉडेलचा गवगवा
यात हेडगेवार रुग्णालयाचे 'औरंगाबाद मॉडेल' सर्वात परिणामकारक ठरले. खर्चापुरताच पैसा कमवायचा हे तत्त्व व्यवस्थापनाने स्वत: तर पाळलेच, पण डॉक्टरही त्याच तत्त्वावर काम करणारे नेमले. त्यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यबुद्धीची जोपासना केली. त्यामुळे रुग्णालय चालवण्याचा खर्च कमी झाला. या सेवाभावामुळे समाजातूनही देणगी मिळते आणि रुग्णांना स्वस्तात सेवा देणे रुग्णालयाला शक्य होते, असे हे माॅडेल आहे.

 

फायदा झाल्यास आसाममध्येच खर्च करणार
रुग्णालय चालवताना पहिली काही वर्षे तोटा होईल हे उघड आहे. तो ओएनजीसीने भरून काढावा, असा प्रस्ताव प्रतिष्ठानने दिला. मात्र, त्यांनी तो फेटाळला. तोटा सहन करण्याची आर्थिक ताकद नसल्याने हा प्रस्ताव नाकारण्याची वेळ आली होती. पण फायदा झाला तर त्यातील एक रुपयाही प्रतिष्ठान औरंगाबादला नेणार नाही. ती सर्व रक्कम आसामध्येच खर्च केली जाईल, हे सांगताच महामंडळाने तोटा भरून देण्याचेही मान्य केले.

 

भावी डॉक्टरांमध्ये बीजारोपण
अशा कामासाठी सेवाभावी वृत्तीचे डाक्टर्स मिळावेत यासाठी हेडगेवार रुग्णालय सेवांकुर प्रकल्प राबवते. त्यात या दरवर्षी ३५० वैद्यकीय विद्यार्थ्यांना आठवड्यासाठी गरीब वस्तीत नेले जाते. तिथे त्यांच्याकडून सर्व्हे आणि रुग्णसेवा करवून घेतली जाते. या शिबिरानंतर गरिबी पाहिलेल्या या भावी डाक्टरांच्या मनात सेवाभाव आपोआपच रुजतो.

 

प्रकल्प नक्की यशस्वी होईल
आसाममधील प्रकल्प सर्वार्थाने आदर्श असावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर आसाममधूनही सेवाभावी डॉक्टर्स नक्की मिळतील, असा विश्वास आहे.
- डॉ. अनंत पंढरे, वैद्यकीय संचालय, डॉ. हेडगेवार रुग्णालय, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...