आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद दंगलीत जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली अकटेत असलेल्या जंजाळला न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- राजाबाजार परिसरातील रंगाचे दुकान आणि वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली अटकेत असणारा युवासेनेचे सचिव, नगरसेवक राजेंद्र जंजाळ यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडी संपल्याने जंजाळला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार हे आदेश देण्यात आले. 


दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळताच जंजाळच्या वतीने नियमित जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यावर शनिवारी (१९ मे) दुपारी २.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. मोहंमद शोहेब अब्दुल मुनाफ (२८, राजाबाजार) यांच्या तक्रारीवरून जंजाळविरोधात जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १५ मे रोजी जंजाळला अटक झाली. न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या दिवशी त्याचा वाढदिवस असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी न्यायालयात गर्दी होऊ शकते, त्यामुळे त्यास हजर करण्यासाठी दुपारचा वेळ द्यावा, अशी विनंती सरकार पक्षाने केली. सुनावणीदरम्यान, तपास पूर्ण झाला असून त्यांच्या ताब्यातून कोणत्याही प्रकारचे हत्यार जप्त करण्यात आले नसल्याचे अॅड. विष्णू मदन पाटील, अॅड. अशोक ठाकरे, अॅड. अभयसिंह भोसले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 


फेरोज खानची हर्सूल तुरुंगात रवानगी 
एमआयएमचा मनपातील विरोधी पक्षनेता फेरोज मोईनोद्दीन खान याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची हर्सूल तुरुंगात रवानगी करण्यात आली. आमदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी फेरोज खान याला सिटी चौक पोलिसांसमोर हजर केले होते. न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यामुळे शुक्रवारी (१८ मे) दुपारी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले. तपास अधिकाऱ्याने सरकारी वकिलांना माहिती दिली नाही, न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यानेच युक्तिवाद केला. तपास पूर्ण झाला असल्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली. 

बातम्या आणखी आहेत...