आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलासनगर-एमजीएम रस्त्याच्या कामाला पंधरा दिवसांनी सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दिव्य मराठीतर्फे गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असलेल्या कैलासनगर ते एमजीएम या बहुचर्चित रस्त्याचे काम याच वर्षात सुरू होणार हे जवळपास नक्की झाले आहे. निविदा अंतिम करण्यात आली असून खासगी वाटाघाटीनंतर निविदेला मान्यता देण्याचा प्रस्ताव शनिवारच्या स्थायी समितीसमोर येण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी निविदेला मान्यता मिळाली तर दिवसांत कार्यादेश होऊन १५ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकते. 


जून पासून रिटेंडर होतेय
यारस्त्यासाठी पहिली निविदा गत वर्षी मे महिन्यात जारी झाली होती. जून ही निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. परंतु दोनच ठेकेदार समोर आले. किमान तीन ठेकेदारांमध्ये स्पर्धा व्हायला हवी. तीनदा निविदा काढूनही दोनच ठेकेदार पुढे आले. तिसऱ्यांदा एकही ठेकेदार आला तर निविदा उघडली जाते. त्यानुसार या दोन्हीही ठेकेदारांनी भरलेल्या निविदांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या दोन्हीही निविदा योग्य ठरल्या. त्यानंतर दरात कपात करण्यासाठी कमी दराची निविदा भरणाऱ्या ठेकेदारासोबत चर्चा सुरू आहे. त्यानंतर प्रस्ताव स्थायी समितीसमोर पाठवून कार्यादेश दिला जाईल. ही प्रक्रिया जास्तीत जास्त पंधरा दिवसांत होऊ शकते. 


असा अाहे रस्ता 
- १३ कोटी ६७ लाख निविदेची रक्कम 
- १८ मीटर रस्त्याची रुंदी 
- १२०० मीटर रस्त्याची लांबी 


२०११ पासून प्रतीक्षा
२०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हाती घेतलेल्या मोहिमेत हा रस्ता रुंद करण्यात आला होता. त्यानुसार जालना रोडवरील ताण कमी होईल, असे सर्वांना अपेक्षित होते. परंतु रस्त्याचे काम होऊ शकले नाही. २०१६ मध्ये रस्त्याच्या पूर्ण विकासासाठी निविदा काढण्यात आली. त्यासाठी १५ कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. हा रस्ता व्हावा यासाठी नागरिकांनीही आंदोलन केले होते. या रस्त्याचे काम झाल्यानंतर औरंगपुरा, समर्थनगर, गुलमंडी यासह जुन्या शहरातील नागरिकांना सिडकोकडे जाताना जालना रस्त्यावर जाण्याची गरज पडणार नाही. आपोआपच येथील वाहतूक कमी होऊन अपघातांची संख्याही कमी होईल. 


आमदार सावेंनी घेतला आढावा
अत्यंत महत्त्वाच्या या रस्त्याचे काम का सुरू होत नाही, अशी विचारणा करत आमदार अतुल सावे यांनी महापौर नंदकुमार घोडेले, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. झाला तेवढा विलंब खूप झाला, आता पुढील प्रक्रिया तातडीने करण्याचे त्यांनी सांगितले. 


१०० कोटींचे रस्ते, एसटीपी लोकार्पणासाठी मुख्यमंत्री, ठाकरे येणार
१०० कोटींच्या रस्त्यांच्या निविदांची तांत्रिक तपासणी अद्यापही सुरूच आहे. यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निविदांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ तसेच भूमिगत गटार योजनेतून नक्षत्रवाडी येथे उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) लोकार्पण हे दोन्हीही कार्यक्रम एकाच वेळी घेण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाच्या निविदा कधी अंतिम होतात, यावर कार्यक्रमाची तारीख अवलंबून आहे.

बातम्या आणखी आहेत...