आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील 55 हजार शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट करणार ‘किसान मित्रा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विदर्भातील ११ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले आहे. किसान मित्रा कार्यक्रम राबवून २०२२ पर्यंत या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य सरकारने इक्रीसॅट या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार विदर्भात सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्याचे इक्रीसॅट डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉ. सुहास वाणी यांनी सांगितले. याचा लाभ विदर्भातील सुमारे ५५ हजार शेतकरी कुटुंबांना होणार आहे. 


या संदर्भात डॉ. वाणी यांनी सांगितले, येत्या  पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा हा कार्यक्रम भारतीय शेती कायापालट मोहिमेअंतर्गत ज्ञानाधारित एकात्मिक शाश्वत शेती समूह  (नॉलेज बेस्ड इंटिग्रेटेड सस्टेनेबल अॅग्रिकल्चर नेटवर्क- मिशन इंडिया फॉर ट्रान्सफॉर्मिंग अॅग्रिकल्चर) किसान मित्रा असा आहे. यात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान  केंद्रे, त्या विभागातील संशोधन संस्था, सामाजिक संस्था आणि खासगी कंपन्या यांचा सहभाग राहील.

 

किसान मित्रा असे आहे

> ११ जिल्ह्यांत किसान मित्रा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक सामाजिक संस्था निवडून त्यांच्याकडे काम दिले जाईल. त्यांच्या मदतीला आंतरराष्ट्रीय निम-उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्थेचे (इक्रीसॅट)  कर्मचारी असतील. दोन ते तीन जिल्ह्यांत एक असे इक्रीसॅटचे शास्त्रज्ञ तेथे मार्गदर्शन करतील.

> कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र तेथे तांत्रिक बाबी आणि सुधारित उत्पादनांचा पुरवठा करतील, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतील.

> हवामान बदलाबाबत वेळोवेळी शेतकऱ्यांना सल्ला देऊन त्यानुसार पुढील धोरण आखण्यास मदत होणार आहे.

> प्रत्येक जिल्ह्यातील ५००० हेक्टर क्षेत्राची प्रायोगिक तत्त्वावर निवड.

> पिकांच्या उत्पादनवाढीबरोबर पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या व्यवसायांना बळकटी देऊन शेतकऱ्यांचा समग्र विकास साधण्यासाठी प्रयत्न. यासाठी आधुनिक व्यवस्थापन तंत्र व यांत्रिकीकरण यात शेतकरी कुटुंबांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

 

> मालाला जास्तीत जास्त भावासाठी कृषी उत्पादन कंपन्या (एफपीसी), कृषी उत्पादक संघटना (एफपीओ) यांच्या मदतीतून मूल्यवर्धित शृखंला व्यवस्था.

 

बाजारपेठेनुसार पिकांची निवड 
डॉ. वाणी यांनी सांगितले, आतापर्यंत शेतकरी त्याला हवे ते पीक घ्यायचा. बऱ्याचदा मागील हंगामात चांगला भाव मिळालेले पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र किसान मित्रामध्ये  जमीन, हवामान आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार करून पिकांची निवड होईल. तसेच बाजारपेठेतील मागणी, आगामी काळातील स्थिती याचा विचार करून पिकांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी उपग्रह, माहिती तंत्रज्ञान आणि जीआयएस यासारख्या शास्त्रीय साधनांची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे पिकांना योग्य भाव मिळून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...