आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल शूटिंगचा पुरावा काेर्टात ठरला निर्णायक; अज्जू बिल्डरच्या खुनात दोघांना जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अज्जू बिल्डर - Divya Marathi
अज्जू बिल्डर

आैरंगाबाद- महापालिका निवडणुकीतील वादातून अज्जू बिल्डर यांचा लाठ्या-काठ्या-तलवारीसह दगडाने ठेचून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी शुक्रवारी सुनावली. २२ एप्रिल २०१३ रोजी इंदिरानगर-बायजीपुरा भागातील नूर मशिदीसमोर झालेल्या या खुनामुळे खळबळ उडाली होती. हा खून झाला तेव्हा घटनास्थळी असलेल्या एका तरुणाने त्याच्या मोबाइलवर शूटिंग केले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन विश्वासात घेतले. न्यायालयाने मोबाइल शूटिंगचा पुरावा ग्राह्य धरून ही शिक्षा ठोठावली. 


या प्रकरणी मृत शेख मोहम्मद अजहर अज्जू बिल्डर (३२) याची आई व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जहुराबेगम शेख अख्तर (६५, रा. इंदिरानगर-बायजीपुरा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २२ एप्रिल २०१३ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नूर मशिदीमध्ये नमाज पडून अज्जू बिल्डर बाहेर पडले व त्यांच्या दुचाकीवर निघाले असता, त्यांना अडवून त्यांच्यावर लाठ्या-काठ्या, तलवारीने गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आला होता. ते खाली कोसळल्यावर त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी कलम ३०२, ३०७, १४७, १४८, १४९ अन्वये जिन्सी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर (२४), शेख अकबर शेख कादर (२८), मुश्ताक सय्यद पाशा (३६), शेख कादर शेख दाऊद (५१, सर्व रा. इंदिरानगर-बायजीपुरा) यांना अटक झाली होती. तेव्हापासून ते अटकेत होते. पोलिस निरीक्षक जी. एस. पाटील (मूळ नाव गफूर पटेल) यांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यावेळी, तत्कालीन सहायक सरकारी वकील राजेंद्र मुगदिया व सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी १६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. 


प्रत्यक्षदर्शींसह आई, भाऊ व डॉक्टरांची साक्ष
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि फिर्यादी व मृताची आई, भाऊ तसेच जावेद अब्दुल गनी व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. कोर्टाने आरोपी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर व आरोपी शेख अकबर शेख कादर यांना कलम ३०२ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी आणि कलम ३२३ अन्वये वरील दोन्ही आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर, सबळ पुराव्याअभावी इतर दोन आरोपींना सोडले. सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांना अॅड. नितीन मोने, पैरवी अधिकारी उत्तम तायडे, पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी सहकार्य केले. ही घटना दुर्मिळ असल्याने आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. 


तरुणाचे प्रसंगावधान
तपासी अधिकारी निरीक्षक गफूर पटेल यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा अगदी बारीक अभ्यास केला. तपासादरम्यान जबाब आणि साक्षी नोंदवत असताना एक मुलगा घटनास्थळाजवळ असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने प्रसंगावधान राखून लपून या घटनेचे मोबाइलवर शूटिंग केल्याचे समोर आले. हे शूटिंग पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक लॅबला पाठवले. अथर यांनी दिलेला जबाब आणि शूटिंग एकमेकांना पूरक ठरले. हा पुरावा निर्णायक ठरला. पोलिसांनी या तरूणाचे नाव गोपनीय ठेवलेगफूर पटेल हे आता सेवानिवृत्त झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...