आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुंडा प्रथा नष्ट करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा : मकरंद अनासपुरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हुंडाच नव्हे, तर लग्नासाठी पैसा नसल्याने मुली आत्महत्या करत असल्याच्या घटना वेदनादायी आहेत. त्यामुळे हुंडा ही प्रथाच बंद करण्यासाठी तरुणाई पुढे आल्यास नैराश्याचे वातावरण दूर होण्यास मदत होईल, असे भावनिक आवाहन अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले. 

 

जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राइड, नाम, भाईश्री फाउंडेशन आणि तोतला परिवारातर्फे बुधवार, १८ एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळा श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमियाँ दर्गा चौक येथे अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे. ती मुळासकट उखडून टाकावी लागणार आहे. याबाबत समाजाने विचार केल्यास नक्कीच सकारात्मक पाऊल पुढे पडेल, यात शंका नसल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात ही संकल्पना पुढे यावी, असे मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. 
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आत्महत्याग्रस्त, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३२ जोडप्यांचे लग्न यामध्ये लावण्यात आले. सोहळ्यात शेतकऱ्यांच्या मुलांसोबत अंध जोडप्यांचादेखील समावेश होता. सकाळी अकराला रुखवत वितरण करण्यात आले. दुपारी तीनला वरात काढून सायंकाळी मुख्य विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. औरंगाबाद, जालन्यासह मराठवाड्यातील वधू-वर वऱ्हाडी मंडळीसह सकाळीच विवाहस्थळी दाखल झाले होते. संयोजकांनी पाहुण्यांचे स्वागत केले. 


या सामुदायिक विवाह सोहळ्यात आत्महत्याग्रस्त तसेच अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील, अंध, अपंग जोडपी विवाहबंधनात अडकली. बालब्रह्मचारी महाराज यांच्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू, मंगळसूत्र आदी साहित्यासह लग्नस्थळी येण्या-जाण्याचा सर्व खर्च संयोजकांनी केला. 
या विवाह सोहळ्यास भाईश्री रमेशभाई पटेल, भावेश पटेल, अॅड. रामेश्वर तोतला, राहुल तोतला, आमदार अतुल सावे, जायंट््सचे अध्यक्ष प्रवीण सोमाणी यांनी नवजोडप्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी सचिव अभय शहा, दिनेश मालानी, विजय चौधरी, राजेश वैष्णव, महेश डागा, नितीन अग्रवाल, श्याम खटोड, गोपाल सारडा, पल्लवी मालानी, विनोद अग्रवाल, निखिल सारडा, श्वेता सोमाणी व सरिता मालाणी यांनी परिश्रम घेतले. 


गरज तेवढेच वाढून घ्या, ताटात अन्न टाकू नका 
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. गरज असेल तेवढेच अन्न ताटात घ्या. ते वाया घालवू नका. आपण वाया घातलेले अन्न गरजूंचे पोट भरू शकते. यामुळे अन्नाची नासाडी टाळण्याचे आवाहन अन्न वाचवा समितीचे अध्यक्ष अनंत मोताळे यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात केले, तर त्यास प्रतिसाद देत अनेक वऱ्हाडींनी अन्न वाचवण्याची मोहीम आपापल्या गावात राबवण्याचा निर्धार केला. मोताळे यांनी हातात अन्नाचे महत्त्व सांगणारा फलक घेऊन लग्नमंडपात प्रबोधन केले.

बातम्या आणखी आहेत...