आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- म्हाडाने वारंवार प्रयत्न करूनही विक्री न होणारे आपल्या चार योजनेतील १०४३ फ्लॅट तब्बल २० टक्के कमी किमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे फ्लॅट खासगी गृहनिर्माण प्रकल्पांपेक्षा महाग असल्याने ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली होती. यात शासनाचे तब्बल २५६ कोटी रुपये अडकले आहेत. यावर उपाय म्हणून घरांच्या किमती घटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे शासनाचे पैसे वसूल होतीलच शिवाय ग्राहकांना स्वप्नातील घर साकारण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागांतर्गत येणारा म्हाडाचा विभागीय घटक, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे शहरात चार ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प आहेत. यात म्हाडाने गेल्या तीन वर्षांत १०६८ घरे बांधली. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक बी.जी.शिर्के यांनी घरांचे बांधकाम केले आहे. मात्र, खासगी बिल्डरच्या तुलनेत ही घरे महाग असल्याने ती ग्राहकांना आकर्षित करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. घरांच्या किमती किमान २० टक्क्यांपर्यंत घटू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आता किमती घटवणार
घरांची विक्री होत नसल्याने त्यांच्या किमती घटवण्यासाठी औरंगाबाद कार्यालयाने मुख्यालयाला अनेकदा प्रस्ताव पाठवले. त्याची दखल घेत म्हाडाने न विकलेल्या घरांच्या किमती घटवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या किमती नेमक्या किती कमी कराव्यात अशी विचारणा करणारे एक पत्र म्हाडाने जारी केलेे होते. त्यानुसार २० टक्के किंमत कमी होईल.
मार्केटिंगही अपयशी
फ्लॅट विकण्यासाठी म्हाडाच्या मार्केटिंग विभागाने कॉर्पोरेट क्लायंट्स शोधले, आठवडी बाजारात फिरले, घरोघरी हँडबिल्स वाटली. मात्र, त्याचा उपयोग नाही झाला. देवळाईतील घरे शहर तर पैठणची घरे ग्रामीण पोलिसांना मिळावीत यासाठीच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. १०६८ पैकी अवघे २५ फ्लॅट विकले गेले, तर १०४३ अजूनही पडून आहेत. खरेदी करणाऱ्या २५ पैकी चार जणांनी घरे परत केली. म्हाडाच्या नियमाप्रमाणे ५ वर्षे घर विकता येत नाही. मात्र, त्यांनी दंड भरून, रजिस्ट्रीचा खर्च पाण्यात घालून किमान ३ ते ४ लाख रुपये नुकसान सहन केले. ४ योजनेत शासनाचे २५६ कोटी अडकले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.