आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेय विकासाचे घ्या, तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेऊ नका; आ. जाधवांचा खैरेंना घरचा आहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- शहरात झालेल्या हिंसक घटनेत दोन निष्पाप जिवांचा मृत्यू झाला. अशा घटनेचे राजकीय अथवा कुठलेच श्रेय घेता येणार नाही. अशा विषयात मुळातच श्रेय घेणे हा प्रकार असंवैधानिक आहे. शहरातील लोकप्रतिनिधी खा. चंद्रकांत खैरे आणि आ. अतुल सावे यांनी विकासकामे आणून त्यांचे श्रेय घ्यावे. शहरातील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था आहे. पायाभूत सुविधांवरील नागरिकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करून त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न तरुणाई हाणून पाडेल, असे मत कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले. 


आैरंगाबादला उद्योगनगरीचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी झटण्याची आणि अधिकाधिक उद्योग शहरात कसे येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नेहमी दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करून त्यावर आपली पोळी भाजण्याच्या खा. चंद्रकांत खैरे यांच्या उद्योगाला जनता विटली आहे. त्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी काढलेला मोर्चाही फ्लॉप झाल्याने आपली पत आेळखून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज असल्याचे आ. जाधव म्हणाले. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी खा. खैरेंबद्दल केलेल्या विधानाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. खा. खैरेंनी दंगलीचे श्रेय घेऊ नये, असे विधान आ. सावे यांनी केले होते. 

 

दंगलीचे श्रेय घेतले जाते का, असे विचारत ज्या घटनेत दोन निष्पाप जीव मारले गेले त्यांच्या मरणाचे श्रेय घेणे कुठल्या संस्कृतीचे प्रतीक आहे?, असा सवालही आ. जाधव यांनी केला. दंगलीमुळे आमदार आणि खासदार होता येते हे आता विसरायला हवे. यावर राजकीय पोळी भाजता येणार नसून आता यापुढे विकास कामांच्या माध्यमातूनच पोळी भाजावी लागणार आहे. हिंदूंना अशात स्वारस्य राहिलेले नाही. नागरिकांना रिझल्ट हवा आहे. शहराची अवस्था बकाल झाली आहे. २५ वर्षांपासून महापालिका ताब्यात असताना नागरिकांना आपण रस्ते, पोटभर पाणी, कचऱ्याची विल्हेवाट, ड्रेनेज, खड्डेमुक्त रस्ते देऊ शकलो नाही. शंभर कोटींच्या रस्त्यांच्या निविदा अंतिम करता येत नाही. मनपा आयुक्त आणण्यासाठी महापौरांची जबाबदारी असताना दिल्लीहून निपुण विनायक आणावा लागतो. महिला स्वच्छता गृहाचा प्रश्न ऐरणीवर आहे याकडे कुणाचे लक्ष नाही. एकही पुढारी विकासाबद्दल बोलत नाही, असे जाधव म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...