आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिन कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण सुरू होताच गोंधळ घालून आरडाओरडा करायचा, त्यामुळे पोलिस लाठीचार्ज करतील. लाठी पडताच सभा उधळून लावायची, असे नियोजन करून काही तरुण सभेत आले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना खुबीने बाजूला घेतले आणि सभा उधळण्याचा मनसुबा हाणून पाडला. या प्रकरणात मनोज भास्कर गरबडे (३०), उमेश धर्मू सूर्यगंध (३३), सुरेश रघुनाथ भालेराव (५९), आकाश भाऊसाहेब इसगल (२५), सुयोग सुहास होपाळ (२८) या पाच जणांना अटक करण्यात आली असून ते पिंपरी चिंचवड येथील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत. छावणी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवले गट वगळता इतर २३ संघटनांनी एकत्र येऊन 'एक विचार एक मंच'साठी पुढाकार घेतला होता. मात्र आठवले गटाने स्वतंत्र व्यासपीठ उभारले. याच ठिकाणी गोंधळ घालून सभा उधळवण्याचे मनसुबे काही तरुणांनी आखल्याची माहिती पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यामुळे सभेच्या ठिकाणी पाचशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. स्वत: पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि उपायुक्त राहुल श्रीरामे बंदोबस्तात सहभागी होते.
पोलिसांनी घेतला मनोजचा जबाब
सभा होण्यापूर्वीच विशेष शाखेच्या अधिकाऱ्याने पुण्याहून आलेल्या समता दलाच्या मनोज गरबडे याची आठवले यांच्याशी भेट करून दिली होती. तेव्हा मनोजने त्याच्या मागण्या आठवलेंना सांगितल्या. त्यांनी त्या मान्यही केल्या. मनोज हा मूळचा मुंबई येथील विलेपार्लेचा आहे. सध्या तो पुण्यात राहत असून औंध येथील एका कंपनीत काम करतो. दीड वर्षापासून तो समता सैनिक दलाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. नामविस्तार दिनासाठी ३० जणांचा गट पुण्यातून शहरात आला होता. हार, फुले वाहण्यापेक्षा पुस्तके वाटण्याचे त्यांचे नियोजन होते.
पोलिसांनी ठेवला संयम
कितीही गोंधळ झाला तरी लाठीचार्ज करायचा नाही, असा निश्चय पोलिसांनी केला होता. आंबेडकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतदेखील पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी लाठीचार्ज होणार नाही, असे सांगितले होते. त्यानुसार गोंधळ घालणाऱ्यांची समजूत काढून त्यांना बाजूला घेण्यात आले. त्यामुळे सभा उधळण्यासाठी आलेल्यांचे नियोजन फसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.