आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री सावंत यांनी दहाच मिनिटांत केली पिकांची पाहणी;रस्त्यालगतच्या शेतातच पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गत चार दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. गारपिटीत मोठ्या प्रमाणात रब्बीचे पीक आणि फळबागांचे नुकसान झाले.  त्याचे सिल्लोड तालुक्यातही पंचनामे सुरू आहे. मात्र नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत हे  सिल्लोड  तालुक्याच्या सीमेवरूनच परतले. बनकिन्होळा येथे रस्त्यालगतच्या शेतात पीक पाहणीची औपचारिकता उरकून त्यांनी दहा मिनिटांत दौरा आटोपता घेतला.


शेतकऱ्यांचे सरकार व शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याची प्रतिमा निर्माण करण्याच्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांवर पालकमंत्री सावंत यांनी दौऱ्याची औपचारिकता पूर्ण करीत पाणी फिरले. तीन दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी   सावंत यांच्या दौऱ्याचे गुरुवारी आयोजन केले होते. दौऱ्यात ते वरखेडी व सिल्लोड शहरालगतच्या खोडकाई वाडी येथे पीक परिस्थितीची पाहणी  करणार होते. परंतु औरंगाबाद-सिल्लोड रस्त्यावरील बनकिन्होळा येथे रस्त्यालगतच्या शेतात जाऊन त्यांनी पीक परिस्थिती पाहणी केली. केवळ दहाच मिनिटांच्या  दौऱ्यात त्यांनी पीक पाहणीचा कार्यक्रम आटोपता घेतला. खोडकाई परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी पालकमंत्री येणार म्हणून दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहिली. पण ते आलेच नाहीत, असे सिल्लोडचे शेतकरी  सुनील प्रशाद यांनी सांगितले.

 

नागरिकांना समस्या मांडण्याची संधीच मिळाली नाही
अत्यल्प पावसामुळे जानेवारीपासूनच उद््भवलेले पाणीटंचाई, आरोग्य सुविधांचा बोजवारा, आठ दिवसांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथून झालेली नवजात अर्भकाची चोरी, नऊ वर्षांपासून रखडलेले ट्रॉमा केअरचे काम अशा अनेक समस्या नागरिकांना पालकमंत्र्यांसमोर मांडायच्या होत्या. परंतु ते सिल्लोड तालुक्याच्या सीमेवरूनच माघारी फिरल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच  पडली.

 

सावंतांनी संधी दवडली
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार आमदार आहेत. पीक पाहणीच्या निमित्ताने पालकमंत्री सावंत यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांना जनतेसमोर जाण्याची संधी होती. जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी  डोणगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिकांना दीपक सावंत यांच्या दौऱ्याचा लाभ जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करून घेता आला नाही. उलटपक्षी आमदार सत्तार यांनी पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करून बाजी मारली.