आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मते देणार नाही, असे खैरेंना सुनावताच जैन म्हणाले, झोपडपट्टी भाषेत बोलू नका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - शहरात जागोजागी कचरा साचला आहे. तुम्ही कामेच करत नाही. आम्ही तुम्हाला मतदान केले. कामे करणार नसाल तर यापुढे मतदान करणार नाही, असे महिलांच्या शिष्टमंडळाने खासदार चंद्रकांत खैरेंना महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनानंतर सुनावले. त्यावर खैरेंशी अशा भाषेत बोलू नका. ही जागा या विषयावर बोलण्याची नाही. आपण ज्येष्ठ आहात. समाजसेवक आहात, झोपडपट्टीच्या भाषेत बोलू नका, असे सभागृह नेता विकास जैन म्हणताच महिला संतापल्या. मात्र, महापौर नंदकुमार घोडेले, सारंग टाकळकर यांनी मध्यस्थी केल्याने पुढील प्रसंग टळला. ही घटना मंगळवारी महाराष्ट्रदिनी पोलिस आयुुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर घडली. 

 

देवगिरी मैदानावर ध्वजवंदनानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांनी नागरिक बसलेल्या ठिकाणी भेट देली. त्या वेळी महिलांच्या शिष्टमंडळतील डॉ. चित्रलेखा मेढेकर, स्मिता अवचार आणि सुरेखा खंदारे यांनी डॉ. सावंत, घोडेलेंना कचराकोंडी लवकर फोडण्याचा आग्रह धरला. या महिलांनी पुन्हा खैरेंची भेट घेतली आणि कचरा कधी उचलणार, असे विचारले. त्यावर खैरेंनी आपण नागरिक म्हणून काय केले? मनपासोबत येऊन काम करा, असे आवाज चढवत सांगितले. त्यावर मेढेकर यांनीही आवाज वाढवत आम्ही तुम्हाला मतदान करतो. आता मतदान करणार नाही, असे ठणकावले. खैरैंनीही काही मतदान करू नका, असे प्रत्युत्तर दिले. वातावरण तापत असताना जैन मध्ये पडले. ताई, आपण यावर नंतर बोलू. ही जागा यावर बोलण्याची नाही, असे सांगू लागले. मात्र, शिष्टमंडळ ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने जैन यांनी आपण खैरे यांना झोपडपट्टीसारखी भाषा वापरू नका म्हणताच परिस्थिती चिघळली. या वेळी घोडेले आणि टाकळकर यांनी मध्यस्थी करून महिलांची समजूत काढली. 

 

घरी जाऊन राग शांत करण्याचा प्रयत्न : 
सकाळी हा प्रकार घडल्यानंतर दुपारनंतर नगरसेवक ऋषी खैरे यांनी मेढेकर यांची घरी जाऊन भेट घेतली. तसेच आपणाला काही अडचणी असतील तर मला सांगा. मी त्या सोडवतो, असे सांगत मेढेकरांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. हे काही वैयक्तिक काम नाही. लक्ष द्या, असे म्हणून मेढेकरांनी ऋषीला शुभेच्छाही दिल्या. 

बातम्या आणखी आहेत...