आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा टाकण्यास विरोध; ट्रकवर केली दगडफेक; 14 वा दिवस; कचराकोंडी कायमच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- नारेगाव येथील आंदोलकांनी कचरा डेपोस सुरू केलेला विरोध १४ व्या दिवशी कायम राहिल्यावर इतर भागांतही मनपाच्या विरोधात जनक्षोभ उसळला. डेपो नसलेल्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी आलेल्या ट्रकवर लोकांनी गुरुवारी दगडफेक केली. मिटमिटा येथे ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात चार ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रयत्न लोकांनी हाणून पाडले. दरम्यान, विभागीय आयुक्तालयात कचराकोंडी फोडण्यासाठी आयोजित बैठका निष्फळ ठरल्या.

 

गुरुवारी सकाळी सात वाजताच कचऱ्याचे दहा ट्रक जांभाळा येथे पोहोचले. त्यातील चार तेथे रिकामे केले. याची माहिती मिळताच तेथील ग्रामस्थ जमा झाले. त्यांंनी कडाडून विरोध केला. एवढेच नव्हे तर टाकलेला कचरा पुन्हा ट्रकमध्ये भरण्यास भाग पाडले. तेथून ट्रक मिटमिटा येथे रिकामे होण्यासाठी येणार असल्याचे कळल्यावर नगरसेवक रावसाहेब आमले,  भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. एका आंदोलकाने ट्रक पेटवण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा ट्रकचालकाने पाणी मारून आग विझवली व ट्रक थेट छावणी पोलिस ठाण्यात नेऊन लावला. दरम्यान, मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या नेतृत्वात ट्रकचा दुसरा जथ्था हनुमान टेकडी (बेगमपुरा) येथे पोहोचला. तेथेही शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना माघारी पाठवले. 

 

कांचनवाडीत दगडफेक
कचऱ्याच्या ट्रकची आणखी एक खेप कांचनवाडीतील मलनिस्सारण प्रकल्पाजवळ पोहोचली. तेथेही प्रचंड विरोध झाला. पोलिस बंदोबस्तात कचरा टाकणे सुरू झाले. ते पाहून लोकांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे वाढीव पोलिस बंदोबस्त मागवून ४० गाड्या कचरा तेथे टाकण्यात आला.

 

नारेगावात मनपाच्या नावाने बोंब मारत होळी

नारेगाव येथील ग्रामस्थांनी आंदोलनाच्या ठिकाणी गुरुवारी रात्री होळी पेटवली होती. औरंगाबाद महापालिकेच्या नावाने बोंब मारत त्यांनी होलिकोत्सव साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...