आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवांनी लक्ष घालताच महापौरांनी घेतला कचराकोंडीचा वाढीव धसका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कचराकोंडीच्या ६३ व्या दिवशी का होईना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष दिले आणि दहा दिवसांत ही डोकेदुखी संपवा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले. या आदेशाचा घोडेले यांनी वाढीव धसका घेतल्याचे शुक्रवारी दिसून आले. तिकडे उद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना इकडे घोडेले हे अधिकाऱ्यांसमवेत सूक्ष्म नियोजन करत होते. 

 

हर्सूल, जकात नाका, रमानगर आणि झाल्टा येथे कचऱ्याचे गठ्ठे तयार करण्यात येणार आहेत. यंत्र अजून तेथे लागलेले नाही, परंतु त्याआधीच शहरातील हा सर्व कचरा तेथे टाकला जाणार आहे. म्हणजे सात दिवसांत शहरातील कचरा वरील चार ठिकाणी गेलेला असेल आणि उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पाळला जाईल याची खबरदारी घोडेले घेताहेत. 


या बैठकीस उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, विरोधी पक्षनेते फेरोज खान, एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी, नगरसेवक राजू वैद्य आदी उपस्थित होते. नियोजन होते, परंतु प्रत्यक्ष कृतीसाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे ही कोंडी सोडण्यासाठी महापौरांनी ४५० शिक्षक आणि ५० डॉक्टर यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी नजीकच्या वॉर्डात जाऊन नियोजन तसेच प्रत्यक्ष कृती करायची आहे. जर यात कोणी कमी पडले तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. 
प्रक्रियेसाठी ४ ठिकाणी कचरा गोळा करणार 


८७ अधिकाऱ्यांचा खांदेपालट 
८७ अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे कचरा उचलण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु त्याचे योग्य नियोजन केले गेले नाही. पडेगावात राहणाऱ्या कर्मचाऱ्याला हर्सूलची जबाबदारी देण्यात आली होती. बन्सीलालनगर येथील कार्यालयात काम करणाऱ्याला मुकुंदवाडी देण्यात आली. त्यामुळे त्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे घोडेले यांनी आजच्या बैठकीत अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना जवळचा वॉर्ड देण्यास सांगितले. त्याचबरोबर पाणीपुरवठा आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले. 


नागरिकांनी विरोध केला तर फौजदारी... 
चार जागांवर कचरा एकत्रित केला जाणार आहे. नंतर तेथे सॉर्टिंग केले जाईल. सुक्या कचऱ्याचे बॉक्स तयार करून ते पुढे उद्योगांना वापरासाठी दिले जातील, तर ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाईल. तरीही येथील नागरिक जागा देण्यासाठी विरोध करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांना आधी समजावून सांगितले जाईल. तरीही त्यांनी विरोध केलाच तर त्यांच्याविरोधात थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्यापासूनच कचरा टाकण्यास सुरुवात होईल, असे घोडेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


रसवंत्या बंद करणार 
रसवंत्यांचा चोथा रस्त्यावर टाकण्यात येतो. यापूर्वी इशारा देण्यात आला होता. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे रस्त्यावर चोथा दिसला की बाजूची रसवंती सील करून ताब्यात घ्यायची, असे नवे धोरण ठरवण्यात येत आहे. सोमवारी बहुतांश रसवंत्या सील केल्या जातील, असे घोडेलेंंनी सांगितले. 

 

पोलिस बंदोबस्तात कारवाई 
हॉटेल्स, मॉल, मंगल कार्यालयांनाही यापूर्वीच स्वत:च्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावा, असे सांगितले होतेे. परंतु त्यांनीही दुर्लक्ष केले. आता या सर्वांवर सोमवारपासून अन्न व औषध प्रशासन, पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे. आधी दंडात्मक व नंतर फौजदारी कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...