आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यात कचरामुक्तीचे स्वीकारले होते आव्हान लक्ष दिलेच नाही; अधिकारीच बैठकांत ठेवले व्यग्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कचराकोंडी फोडण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हेच पुरेसे आहेत. ते आव्हान स्वीकारतील आणि ४५ दिवसांत शहर कचरामुक्त करतील, असे नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ९ मार्चला जाहीर केले होते. २३ एप्रिलला ४५ दिवसांची मुदत संपली. या काळात डॉ. भापकर यांनी शहरातील कचराकोंडीकडे लक्ष तर दिले नाहीच, उलट या दिवसांत समितीचा प्रमुख या नात्याने दररोज बैठका घेत महापालिकेचे अधिकारीच व्यग्र ठेवले. बुधवारी कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध झालेली असताना तातडीने कचरा रवाना करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले नियोजन करत होते तेव्हा डॉ. भापकर यांनी महापालिकेतील प्रमुख अधिकारी बैठकीसाठी विभागीय आयुक्तालयात बोलावून घेतले होते. 
कचराकोंडीची तीव्रता वाढल्यानंतर ९ मार्चला म्हैसकरांनी औरंगाबादेत येऊन विभागीय आयुक्तालयात बैठक घेत हा प्रश्न सोडवण्याचे आव्हान डॉ. भापकरांवर सोपवले होते.

त्याचबरोबर समिती गठित करून त्याचे अध्यक्षपदही डॉ. भापकरांकडे दिले. ४५ दिवसांत हा प्रश्न सोडवतो, असे आश्वासन त्यांनी प्रधान सचिवांना दिले. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी लक्ष घातले नाही. नियोजित गॅस प्रकल्पासाठी जागा शोधण्याचे अधिकारही सर्वोच्च न्यायालयाने डॉ. भापकर अध्यक्ष असलेल्या समितीकडे दिले. या समितीने चिकलठाण्यातील दुग्धनगरीची जागा या प्रकल्पासाठी निवडण्याचे एकमेव काम केले. 


अधिकाऱ्यांची नाराजी : फील्डवर काम करण्याची वेळ असताना इकडे डॉ. भापकर आणि तिकडे महापौरही बैठका घेत असल्याने अधिकाऱ्यांचा बहुतांश वेळ यातच गेला. बैठकांना हजेरी लावायची व त्यानंतरही काम होत नसल्याने वरिष्ठ नाराज होत असल्याने अधिकाऱ्यांनीही बैठकांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

 

सुट्या सोडल्या तर रोजच बैठका, बुधवारीही कचरा उचलण्याच्या धांदलीतच बैठक 
समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. भापकर रोज कामाचा आढावा घेत. त्यासाठी दररोजच बैठक बोलावली जात होती. बुधवारी ४७ व्या दिवशीही दुपारी बैठकच सुरू होती. इकडे कचरा उचलून नेण्यासाठी महापौर नियोजन करत असताना वाॅर्डाधिकारी तसेच अन्य विभागप्रमुखांना बैठकीसाठी विभागीय आयुक्तालयात बोलावण्यात आले होते. 

 

कागदावरच आढावा 
गेल्या ४७ दिवसांच्या काळात डॉ. भापकरांनी एक दिवस स्वच्छता मोहीम राबवली. त्यानंतर रस्त्यावर फिरून प्रत्यक्ष पाहणी केली नाही. दररोज कागदावर आढावा घेण्यातच ते व्यग्र दिसले. महापालिका अधिकाऱ्यांकडून कागदावर अहवाल घेणे आणि ते पुढे शासनाकडे पाठवण्याचे यशस्वी काम त्यांनी केले. 

 

नारेगावकर म्हणाले, आहे त्याच कचऱ्यावर प्रक्रिया करा, नवीन आणूच नका 
अयशस्वी शिष्टाई : ४५ दिवसांच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. भापकर यांनी नारेगावकरांशी अयशस्वी चर्चा केली. फक्त दहा दिवस कचरा टाकू द्या अशी त्यांनी केलेली विनंती गावकऱ्यांनी साफ फेटाळली.
 
षड्डू ठोकणारा पहिलवान अशी भापकरांची ओळख 
खरे तर डॉ. पुरुषोत्तम भापकर हे षड्डू ठोकणारे पहिलवान आहेत. कोणी अाव्हान दिले तर डॉ. भापकरांनी स्वीकारले नाही असे कधी झाले नाही. परंतु या वेळी नेमके काय घडले हे समजू शकले नाही. कारण प्रतिक्रियेसाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. एक तर त्यांनी हे आव्हान स्वीकारले नसावे किंवा यात पहिल्यांदाच ते अयशस्वी झाले असावेत. 


कचराकोंडी करून औरंगाबादकरांच्या नाकातोंडात दम आणणाऱ्या नारेगाव-गोपाळपूरसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बुधवारी महापालिकेने मध्यवर्ती जकात नाक्यावर कचऱ्यावर होत असलेली प्रक्रिया पाहण्यासाठी बोलावले. प्रक्रिया केलेल्या कचऱ्याचे खत होते, त्यामुळे आणखी पाच हजार टन कचरा प्रक्रियेसाठी नारेगाव डेपोत टाकू द्या, अशी विनंती केली. ही प्रक्रिया पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नारेगाव डेपोत साठून असलेल्या ३० लाख मेट्रिक टन कचऱ्यावरच आधी प्रक्रिया करून संपवा, आम्ही ते खत घेऊन जाऊ, परंतु नवीन कचरा टाकू नका, असे सांगत महापालिकेचा कावा उधळून लावला. 

 

५०० टन कचरा उचलला झाल्ट्यात बळाचा वापर 
कचराकोंडी तीन दिवसांत मार्गा लावू, असे आश्वासन राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्यानंतर बुधवारपासून महापालिका अंग झटकून कामाला लागली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रभाग-एक, दोन आणि नऊमधील सुमारे तब्बल ५०० टन कचरा उचलून झाल्टा येथे नेण्यात आला. सुरुवातीला झाल्टा येथे नागरिकांनी विरोध केला. अधिकारी-नागरिकांत हमरीतुमरीही झाली. कचऱ्यावर प्रक्रिया होईल, असे सांगूनही विरोध कायम राहिल्याने सिडको एमआयडीसी पोलिसांचा ३० जणांचा फौजफाटा बोलावून येथे कचरा टाकण्यात आला. शहरातील कचरा तीन दिवसांत संपेल, असा दावाही महापौरांनी केला. साचलेला पाच हजार टन कचरा हर्सूल, सावंगी, झाल्टा जकात नाका, रमानगर आणि मध्यवर्ती जकात नाका येथे टाकला जाईल. मुदतीत रस्ते कचरामुक्त करण्यासाठी खासगी वाहने व अतिरिक्त कर्मचारी मागवून बुधवारी रात्रीतही मनपाने कचरा उचलण्याचे काम सुरू ठेवले. रात्रीतून किमान ९० ट्रक कचरा उचलून तो कचरा प्रक्रियेसाठी नियोजित ठिकाणी हलवला. मनपाकडे मोठी वाहने कमी असल्याने तत्काळ दोन हायवा ट्रक मागवून घेण्यात आले. 


मशीन खरेदी प्रक्रिया सुरू असून दोन दिवसांत निविदा उघडू. तोपर्यंत नियोजित जागेवर कचरा जाणे आवश्यक असून त्यावर केमिकल टाकण्याची प्रक्रिया होईल, असे महापौर म्हणाले. 


या भागातून उचलला कचरा 
बुधवारी समर्थनगर, औरंगपुरा, पैठण गेट, किलेअर्क, गरम पाणी-ज्युबिली पार्क, मध्यवर्ती जकात नाका येथून कचरा उचलून तो प्रक्रियेसाठी झाल्टा जकात नाका येथे हलवला. गुरुवारी हर्सूल-सावंगी येथे प्रभाग तीनमधील कचरा टाकण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...