आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेतील अभियंत्याने सदस्यांना ठरवले 'नालायक'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेतील शाखा अभियंता जयंत खरवडकर यांनी लोकप्रतिनिधींना नालायक ठरवणारी पोस्ट फेसबुकवर अपलोड केल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली. खरवडकर यांनी सभागृहाचा अवमान केला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करत उपमहापौर विजय औताडे, माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, राजगौरव वानखेडे, गजानन मनगटे यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी धाव घेतली. खरवडकर यांना निलंबित केलेच पाहिजे, अशी मागणी केली. सायंकाळी दीड तास आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांत खलबते झाली. तेव्हा खरवडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय मुगळीकर यांनी घेतला. त्याचबरोबर त्यांच्याकडील सर्व पदभार काढून अधिकार गोठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 


खरवडकर यांची गतवर्षी एप्रिलमध्ये नगररचना विभागातून अतिक्रमण विभागात बदली करण्यात आली होती. परंतु ते अद्यापि तेथे रुजू झाले नाहीत. त्यावर जंजाळ व वानखेडे यांनी सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठकीत वेळोवेळी विचारणा केली. मात्र आयुक्तांनी त्यांना बदलीच्या जागेवर रुजू होण्याचे आदेश दिले नाहीत. तरीही त्यांचा पगार सुरूच आहे. सभागृहात चर्चा होऊनही काहीच होत नसल्याने त्यांनी पोस्ट टाकून लोकशाही तसेच सभागृहाचा अवमान करतानाच नगरसेवकांची खिल्ली उडवली. 


फेसबुकवरची पोस्ट 
'नालायक लोकांना बोलण्यासाठी सभागृह मिळालं की ते तत्त्वज्ञानी बनून बेछूट आरोप करतात. याला लोकशाही म्हणतात.' 


सभांच्या दिवशी रजा 
गेल्या सहा महिन्यांपासून खरवडकर हे सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठकीकडे फिरकले नाहीत. प्रत्येक सभेच्या दिवशी ते रजा टाकून जातात. सभेच्याच दिवशी त्यांना रजा कशी काय मंजूर केली जाते, असा सवाल नगरसेवकांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...