आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको उड्डाणपुलाच्या नामकरण सोहळ्यात बंजारा परिषदेचा गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने रविवारी सकाळी साडेदहा वाजता आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. आता नाईक यांचे नाव देणे शक्य नसल्याचे सांगत महापौर नंदकुमार घोडेले यांनी   कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाईक यांचेच नाव देण्याची मागणी करत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी परिषदेच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर नामकरण सोहळा पार पडला. 

 

सिडको चौकात उड्डाणपूल बांधण्याच्या आधीपासून बंजारा समाज आणि परिषदेच्या वतीने या चौकाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर उड्डाणपुलाला नाईक यांचेच नाव देण्याची मागणी केली होती. मात्र मनपाने ही मागणी मान्य केली नाही. रविवारी सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तेव्हा महापौर नंदकुमार घोडेले आणि आमदार अतुल सावे तेथे हजर होते. बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत या नामकरणास सोहळ्यास विरोध केला. सिडको चौकात वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला दुसऱ्या व्यक्‍तीचे नाव देणे चुकीचे आहे, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. या वेळी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रविकांत राठोड, डॉ. कृष्णा राठोड, रविकांत राठोड, दत्ताभाऊ राठोड, संतोष चव्हाण, रविराज राठोड, मुकेश जाधव, सुनील चव्हाण, रविराज चव्हाण, जयहिंद चव्हाण, गणेश राठोड, विकास राठोड, सुनील जाधव, मदनलाल चव्हाण, प्रा. विक्रम राठोड, शुभम जाधव आदींची उपस्थिती होती. अखेर पोलिसांनी चाळीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. थोड्याच वेळात खासदार चंद्रकांत खैरे तिथे पोहोचले. त्यानंतर हा नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी आमदार संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेता विकास जैन, माजी आमदार किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजू वैद्य, गजानन बारवाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, मिलिंद दाभाडे, माधुरी अदवंत, कीर्ती शिंदे, मनोज गांगवे उपस्थित होते. 


सिडको उड्डाणपुलाच्या नामकरण सोहळ्यात बंजारा परिषदेचा गोंधळ 
सिडको उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 


पाटी बदलून आधी नाईक चौक असे लिहा 
महापौरांनी सर्वसाधारण सभेत सावरकरांचे नाव देण्याबाबत ठराव झालेला आहे, असा खुलासा केला. त्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. मात्र महापौरांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द करता येणार नाही, असे सांगत हवे तर आपण येथील पाटी बदलून त्यावर आधी वसंतराव नाईक चौक आणि त्याखाली वि. दा. सावरकर उड्डाणपूल असे नाव लिहू, असा प्रस्ताव ठेवला. त्यावरही कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. 


 

बातम्या आणखी आहेत...