आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे धरसोड धोरण, हतबल आयोग अन् संतप्त स्पर्धा परीक्षार्थी;स्पर्धा परीक्षांचे विश्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विविध विभागांतील पदे भरण्यात सरकारचे धरसोड धोरण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची हतबलता यामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी आता थेट मोर्चाचे हत्यार उगारले आहे. राज्यात औरंगाबाद, पुणे, नाशिक, बीड, नांदेड अशा अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षार्थींनी मोर्चे काढून सरकारचा निषेध केला आहे. या परीक्षार्थींवर सरकारनेच ही वेळ आणल्याचे व परीक्षार्थींच्या मागण्या योग्य असल्याचे मत स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  


राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सर्वात जास्त स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. साहजिकच एमपीएससीच्या जाहिरातींकडे हजारो    पदवीधरांचे डोळे लागलेले असतात. मात्र दिवसेंदिवस कमी होणारी पदसंख्या, वाढती स्पर्धा आणि घटणाऱ्या संधी यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांत अस्वस्थता वाढते आहे. त्यातूनच यंदा केवळ ६९ पदांसाठी एमपीएससीने राज्य सेवा परीक्षेची जाहिरात काढली आहे. त्यामुळे परीक्षार्थींचा हिरमोड झाला. यामुळे संतप्त परीक्षार्थींनी राज्यात मोर्चे काढून निषेध नोंदवला. 


इतर मागण्या अशा...
राज्यसेवा परीक्षेसाठी  उमेदवारांची प्रतीक्षा  यादी जाहीर करण्यात यावी
सरळ सेवेतील ३०% कपातीचा निर्णय शासनाने मागे घ्यावा  
राज्यसेवा परीक्षांच्या संख्येत वाढ करावी. एमपीएससीची संयुक्त परीक्षा रद्द करावी  
केंद्रीय आयोगाप्रमाणे सी-सॅटची परीक्षा पात्रतेपुरती ठेवावी. परीक्षा शुल्क कमी करावे

 

पदभरती जाहिरातीत सर्व पदे व जागांचा सुरुवातीपासूनच समावेश असावा:तज्ञांचे मत
ही मागणी अत्यंत योग्य आहे. कारण पदे व जागा कमी असतील तर अनेक जण धास्ती घेतात, पदे वाढतील की नाही अशा संभ्रमात अभ्यास सोडून देतात. मात्र असे करणे योग्य नाही.  सर्व पदांची जाहिरात एकत्र येणे केव्हाही चांगले. त्यामुळे परीक्षार्थींत उत्साह येऊन, संभ्रम राहणार नाही.

 

पोलिस उपनिरीक्षकपदाची पूर्व परीक्षा स्वतंत्रपणे घ्यावी:तज्ञांचे मत

पूर्वी पीएसआय, एसटीआय आणि असिस्टंट  पदांसाठीची पूर्व परीक्षा एकत्र व्हायची. नंतर ती वेगळी झाली, पुन्हा एकत्र झाली. कारण तिन्ही पदांच्या परीक्षा वेगवेगळ्या झाल्या, तर परीक्षार्थींना तीन संधी मिळतात. या परीक्षा एकत्र घेतल्याने आपल्या दोन संधी हुकतात असे परीक्षार्थींना वाटते.

 

आयोगाकडून अपेक्षा
जशी मागणी असेल तशी एमपीएससीला जाहिरात द्यावी लागते. जागा वाढतील असे आयोगाने नमूद केलेले असते, मात्र आयोगाने शासनाकडे पाठपुरावा करून पदसंख्या जाहिरातीच्या वेळीच एकत्र दिल्यास स्पर्धा व संधी वाढतील.

 

आयोगाकडून अपेक्षा
या तिन्ही पदांसाठी जवळपास सारखाच अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे स्वरूपही सारखेच आहे. त्यामुळे सुलभीकरणाच्या हेतूने परीक्षा एकत्र घेतली जाते. मात्र, परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन परीक्षा वेगवेगळ्या घेणे शक्य आहे.

 

> परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घ्यावी

तज्ञांचे मत
डमी उमेदवारांकडून परीक्षा देण्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी योग्य आहे. डिजिटल युगात हे शक्य आहे. मात्र, डमी उमेदवारांचे प्रकार होऊच नयेत, यासाठी  सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

आयोगाकडून अपेक्षा
यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. डमी उमेदवार प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी.

 

मागण्या रास्त, पण अभ्यास महत्त्वाचा
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्या त्यांनी मांडल्याही आहेत. मात्र परीक्षार्थींसाठी सर्वात महत्त्वाचा अभ्यास आहे. त्यांनी एकाग्रता भंग न होऊ देता, चिकाटी न सोडता अभ्यास करावा. मागील ४ ते ५ वर्षांचा अनुभव पाहता पूर्वपरीक्षा  निकालावेळी जागा वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आशावादी राहून आपले लक्ष्य गाठण्यासाठी अभ्यास हाच सर्वात उत्तम पर्याय आहे. 
- मनोहर भोळे, युनिक फीचर्स, पुणे

बातम्या आणखी आहेत...