आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर असलेले आरोग्यमंत्री कचऱ्याच्या संकटावर उपचार न करताच परतले !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगाव कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत येणार असल्याने 'आज कचराकोंडी फुटणार' असे औरंगाबादकरांना वाटत होते, परंतु पालकमंत्र्यांचा दौरा अवघा ३ तासांचा होता. विमानातून उतरल्यापासूनच त्यांना परतीच्या विमानाची वेळ पाळायची होती. या घाईत त्यांनी स्वत: आदोलकांसमोर प्रस्ताव ठेवलाच नाही. 


आयुक्त दीपक मुगळीकर यांनी आम्हाला १४८ दिवस लागतील, असे सांगितले तर पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी महापालिकेला काही दिवसांची मुदत द्यावी, एवढेच काय ते पालकमंत्री बोलले. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तालयात येऊन चर्चा करावी, असे सांगितले. परंतु पुढील पाच महिने येथे कचरा टाकणे सुरूच ठेवण्याचा प्रस्ताव असल्याने आंदोलकांनी चर्चेसाठी विभागीय आयुक्तालयात जाण्यास नकार दिला. आंदोलक चर्चेसाठी आलेच नाही. दोन-तीन दिवसांत यातून मार्ग काढू, असे सांगून डॉ. सावंत मार्गस्थ झाले. दरम्यान, आंदोलकांनीच शब्द न पाळल्याने प्रस्ताव ठेवता आला नाही, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. या फसलेल्या दौऱ्यामुळे औरंगाबादकरांवरील कचऱ्याचे संकट आठव्या दिवशीही कायम असून प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून आले.

 
गुरुवारी महापालिका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री सावंत शुक्रवारी येतील, असे सांगण्यात आले होते. ते आंदोलकांसमोर प्रस्ताव ठेवून सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती करणार, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे उद्या तोडगा निघेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु साडेपाच वाजता पालकमंत्री सावंत आंदोलनस्थळी आले. तेथे आंदोलनकर्ते आणि आंदोलनकर्त्यांच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी बाजू मांडली. तेव्हा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तालयात जाऊन अंतिम चर्चा करावी, अशी सूचना करण्यात आली. 


तीन पर्याय 
जिल्हाधिकारी राम यांनी नारेगाव, बाभूळगाव, मिटमिटा येथील सफारी पार्कमध्ये शनिवारी कचरा टाकण्याचे पर्याय असल्याचे सांगितले. 


म्हणे आंदोलकांनीच शब्द पाळला नाही 
पालकमंत्र्यांनी आंदोलकांसमोर प्रस्ताव का सादर केला नाही, असा प्रश्न केला असता आंदोलकांचे प्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी विभागीय आयुक्तालयात येणार होते. तेथे प्रस्ताव ठेवला जाणार होता. त्यामुळे नारेगाव येथील चर्चेत पालकमंत्र्यांनी प्रस्ताव ठेवला नाही. त्यांना वाटले शिष्टमंडळ विभागीय आयुक्तालयात येत आहे. त्यांनीच शब्द न पाळल्याने त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला गेला नसल्याचा युक्तिवाद महापौर घोडेले यांनी केला. 


आज काय होऊ शकते? 
डॉ. सावंतांना औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कचऱ्याच्या प्रश्नापेक्षा विमानाची वेळ पाळत मुंबई गाठणे वाटले महत्त्वाचे 


गरज पडली तर बळाचा वापर 
नारेगाव येथे कचरा टाकण्यासाठी बळाचा वापर करता येईल, असे भाष्य मुगळीकर यांनी केले, तेव्हा ही तुमची सूचना आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी करताच 'बिलकूल नाही, माझी अशी सूचना नाहीच' असे म्हणत त्यांनी कानावर हात ठेवले. तेव्हाही जिल्हाधिकारी राम मध्ये पडले. गरज पडली तर बळाचा वापर करण्याचा विचार सुरू आहे, अर्थात तो आमचा निर्णय असेल, परंतु नारेगावातील विरोध योग्य नाही, असे आमचे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


शहरात एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमासाठी पोलिस तैनात असल्याने शनिवारी नारेगाव येथे पोलिस बळाचा वापर अशक्य आहे. त्यामुळे अन्य दोन पर्यायांचा वापर किंवा कचरा तसाच पडून राहू देणे यापलीकडे महापालिका काहीही करू शकत नाही. 


सावंतांनी केली निराशा 
आरोग्यमंत्री सावंत डॉक्टर असल्याने त्यांना लोकांच्या आरोग्याची काळजी असेल, त्यामुळे ते कचरा प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी निराशा केली. 


आमचा जयाजी करू नका 
आंदोलकांशी चर्चा करताना पालकमंत्र्यांनी डॉ. कल्याण काळे यांच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. हे पाहून शेतकरी आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांचे कान फुंकले आणि आंदोलन फिसकटले. त्याप्रमाणे आमचा जयाजी करू नका, असे आंदोलकांनी सुनावले. काळे म्हणाले, आधी भाजपचे घडमोडे महापौर होते म्हणून बागडे नाना आले आता सेनेचे घोडेले आहेत म्हणून खैरे आलेत, असा टोला खैरेंना लगावला. 


खासदार चंद्रकांत खैरे अलिप्तच 
एरवी औरंगाबाद शहरातील प्रत्येक घटना-घडामोडीसाठी मीच पुढाकार घेतला, मीच ते घडवून आणले, मीच तोडगा काढला, असे सांगणारे खासदार चंद्रकांत खैरे नारेगाव प्रश्नावर अलिप्त आहेत. त्यांनी कोंडी फोडण्यासाठी ठोस प्रयत्न केलेच नाहीत. याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 


'दीप' पेटला नाही, 'राम' ठरले 'पुरुषोत्तम' 
उद्याचा कचरा कोठे टाकणार असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, ते अजून ठरले नाही असे उत्तर महापौर घोडेले यांनी दिले, तर कचरा टाकणार कोठे, असा प्रश्न मुगळीकर यांना करण्यात आला असता, त्यांनी थेट विभागीय आयुक्त भापकर यांच्याकडे बोट करत 'साहेब सांगतील तेथे टाकू' असे बिनधास्त उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने डॉ. भापकरही गडबडले, पण काहीच बोलले नाही. जर डॉ. भापकर म्हणाले कोठेच कचरा टाकू नका तर या प्रश्नावर मात्र मुगळीकरांनी मौन धारण केले. उद्याचे काय, असा प्रश्न पुन्हा आल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी 'मी बोलू का?' असे विचारणा करत उत्तर दिले. अर्थात कचरा नेमका कोठे टाकला जाईल, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. ही जबाबदारी वरिष्ठ म्हणून आपल्याकडे घेत त्याचे उत्तर डॉ. भापकर यांच्याकडून अपेक्षित होते. परंतु या प्रकरणात त्यांचाही कोंडमारा झाल्याचे या वेळी दिसून आले. 

बातम्या आणखी आहेत...