आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या नियमानुसार गुंठेवारी ठरल्या ‘अनियमित बांधकाम’ वसाहती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरालगतच्या भागांना पूर्वी गुंठेवारी भाग म्हणून संबोधित करण्यात येत होते. शहरात ११८ वसाहतींमधील ७० हजार घरांचा यात समावेश आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियमात केलेल्या दुरुस्तीमुळे ‘गुंठेवारी’ऐवजी आता ‘अनियमित’ अथवा ‘अनधिकृत मालमत्ता’ अशी नोंद मनपाच्या दप्तरी होईल. त्यानुसार शहरासह सातारा -देवळाईतील एक लाख मालमत्ता नियमित कराव्या लागणार आहेत. 


मुंबई, पुणे, नाशिक, नागरपूरप्रमाणे औरंगाबाद शहरातही अनधिकृत वस्त्यांचे जाळे पसरत चालले होते. महापालिकेत त्या वसाहतींची गुंठेवारी म्हणून नोंद करण्यात येत होती. या वसाहती अनियमित असल्याने त्यांना प्रचलित शब्दांप्रमाणे गुंठेवारी भागातील मालमत्ता संबोधण्यात येत होते. २००० पर्यंतच्या या वसाहती नियमित करण्यासाठी शासनाकडून अनेकदा प्रयत्नही झाले. मात्र नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तताच केली गेली नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत शहरातील केवळ सहा हजार मालमत्ता नियमित झाल्या आहेत. अशीच स्थिती इतर मनपाची होती. त्यामुळे शासनाने नवीन नियम तयार करून शहरात असणाऱ्या अनियमित मालमत्ता नियमित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार शहरातील मालमत्ता म्हणजेच गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्यात येणार आहेत. 


दंड आकारून नियमितीकरण 
आतापर्यंत मनपाच्या नगरविकास विभागाच्या वतीने स्वतंत्र गुंठेवारी विभागाद्वारे गुंठेवारीच्या मालमत्तांना नियमित करण्यासाठी शिबिरे घेण्यात आली. त्यातूनच मालमत्ता नियमित करण्यात आल्या. अद्यापही त्रुटी असलेल्या संचिकांची यादी मोठी आहे. नागरिकांनी संचिका परिपूर्ण करून दिल्यास प्रशमन शुल्क आकारून अशा मालमत्ता नियमित करता येतील. 
-ए.बी. देशमुख, संचालक, सहायक नगररचना विभाग. 


सातारा-देवळाईला लाभ 
आतापर्यंत ११८ वसाहतींतील ६० हजार मालमत्ता गुंठेवारीत नियमित करण्यात येणार होत्या. यात सातारा आणि देवळाईतील ४० हजार मालमत्तांचीही भर पडली आहे. त्यानुसार एक लाख मालमत्तांचे मनपाला नियमितीकरण करावे लागेल. 


१२ हजारांहून अधिक संचिका महापालिकेकडे 
मनपाकडे गुंठेवारीनुसार १२ हजार संचिका पडून आहेत. यात अनेक त्रुटी असल्याने या पूर्ण करण्यात आल्या नाहीत. मात्र ज्या संचिका पूर्ण आहेत अशा सहा हजारांपेक्षा जास्त संचिका मनपाने निकाली लावल्या आहेत. यात आता नवीन संचिकांचीही भर पडेल.

बातम्या आणखी आहेत...