आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या पायथ्याशी चाळीस वर्षांनंतर फुलली अडीच एकरांत बाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी बाभळींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या भागात कोणी फिरकतही नव्हते. मात्र जायकवाडीचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेत गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम हाती घेत सुंदर बाग फुलवली आहे. कधीकाळी काटेरी बाभळीचा   परिसर आता फळबाग आणि गुलाबाच्या फुलांनी बहरला आहे. 


जायकवाडी परिसरात ४० वर्षांपूर्वी तीन एकरात जांभूळबन उभारण्यात आले होते. तेव्हा जांभळाची पाचशे झाडे लावण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच जायकवाडीच्या कर्मचाऱ्यांनी खुल्या कारागृहातील कैद्यांच्या मदतीने हा परिसर फुलवला आहे. पूर्वी या ठिकाणी कोणीच जात नसे. आता बाग पाहून मन प्रसन्न वाटत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. 


कागदावर नव्हे, प्रत्यक्षात जगवली लावलेली सर्व झाडे 
झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम प्रशासनाकडून नेहमीच राबवण्यात येते. प्रत्यक्षात झाडे जगण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. शाखा अभियंता चव्हाण यांनी पुढाकार घेत दोन वर्षांपूर्वी बाग फुलवण्याचा निश्चय केला. त्यांना कर्मचाऱ्यांनीही साथ दिली. या ठिकाणी ३०० पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली असून सर्वच जगली आहेत. येथे नारळ, आवळा, पेरू, चिकू, आंबा, गलांडे, गुलाब यासह विविध फुले आणि फळांची रोपे लावण्यात आली आहेत. 


कैदीही करतात मदत 
बाग फुलवण्यासाठी पैठणच्या खुल्या कारागृहातील काही कैदी मदतीला येतात. त्यामुळे बागेची व्यवस्थित निगा राखली जाते. झाडांना पाणी देण्यापासून इतर कामेही कर्मचारी करतात. गलांडाची फुले मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्यांची विक्री केली जात नाही. 


बागेमुळे प्रसन्न वाटते 
आमच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत करून ही बाग फुलवली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बाभळी असल्यामुळे इकडे कोणी फिरकत नव्हते. मात्र आता हा परिसर पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे समाधान वाटते. - अशोक चव्हाण, शाखा अभियंता, जायकवाडी धरण 

बातम्या आणखी आहेत...