आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर घोडेलेंचा क्षमाभाव कामचुकारांच्या पथ्यावर, आणीबाणीतही कर्मचाऱ्यांचे लाड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पूर्णवेळ आयुक्त नसताना शहर कचरामुक्त करण्याचे 'शिवधनुष्य' पेलण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांची दिवसरात्र मरमर चाललेली दिसते. परंतु कर्मचाऱ्यांवर मात्र त्यांचा धाक राहिला नसल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांतून दिसून आले. कर्मचारी काम करत नाहीत म्हणून कारवाईचे आदेश द्यायचे, हातात नोटीस पडल्यानंतर तो कर्मचारी दालनात येऊन रडला की कारवाई मागे घेण्याच्या सूचना द्यायच्या असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. महापौरांच्या या क्षमाभावामुळे कर्मचाऱ्यांना धाक राहिलेला नाही. अर्थात कामचुकारी वाढली असून त्याचा फटका कचराकोंडी फोडण्यात बसत असल्याचेही स्पष्ट होते. 

 

कोणाचेही मन दुखवायचे नाही, हा महापौरांचा स्वभाव मनपाची कामे होण्याच्या आड येत असल्याचे दिसते. सध्या विशेष बाब म्हणून कचरा वेगळा कसा करायचा याचे स्टिकर्स बसवण्याचे काम शिक्षकांना सोपवण्यात आले आहे. बायजीपुरा येथील शाळेत एका शिक्षिकेने यास आक्षेप घेतला. 'कचऱ्यात काम करताना आम्ही आजारी पडलो तर जबाबदार कोण?' असा सवाल करत एक प्रकारे तिने काम करण्यास नकार दिला होता. यामुळे संतप्त झालेल्या घोडेले यांनी त्या शिक्षिकेला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली. नोटीस हाती पडताच ती शिक्षिका रडत दालनात येऊन बसली. तेव्हा सक्तीच्या रजेवर पाठवू नका, असे घोडेलेंनीच शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले. त्यानंतर शिक्षिका निघून गेली. येथे कारवाई होत नाही, असेच तिचे भाव होते. या प्रकारामुळे प्रशासनावर महापौरांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होते. आपल्याला काम करायचे आहे, कारवाई करून काम थांबवायचे नाही, अशा शब्दांत घोडेले यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले. 


शिपायांसमोर उभे केल्याने अधिकारी झाला नाराज 
कोणाच्या काही अडचणी असल्या की महापौर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतात. गत आठवड्यात चतुर्थश्रेणी कर्मचारी निवेदन घेऊन आले होते. तेव्हा कर्मचारी बसलेले आणि वरिष्ठ अधिकारी उभे असे चित्र होते. अधिकारी आमचे काम करत नाहीत, अशी शिपायांची तक्रार होती. यानंतर महापौरांनी अधिकाऱ्यालाच झापले. याचा परिणाम मात्र उलटा झाला. आता ते शिपाई अधिकाऱ्यांचेही ऐकेनात अन् इकडे शिपायांसमोर मला उभे केले म्हणून ते अधिकारीही नाराज आहेत. 

बातम्या आणखी आहेत...