आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारेगाव कचरा डेपो हटवण्यासाठी पुन्हा महिन्याची मुदत; ग्रामस्थांच्या सभेत निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मांडकी शिवारातील नारेगावचा कचरा डेपो हटवण्यासाठी ग्रामस्थांनी महापालिकेला पुन्हा महिन्याभराची मुदत दिली आहे. या काळात कचरा हटवला नाही तर १६ फेब्रुवारीपासून येथे शहरातील कचरा टाकू दिला जाणार नाही, असा निर्णय रविवारी ग्रामस्थांच्या सभेत घेण्यात आला. 


नारेगाव येथील कचरा डेपो हटवावा या मागणीसाठी मांडकी, गोपाळपूर, महालपिंप्री, नारेगाव, वरूड, पोखरी, रामपूर, चिकलठाणा, पळशी, वडखा, वरझडी, कच्चेघाटी, पिरवाडी, बकापूर, सुलतानपूर, ब्रिजवाडी, मसनतपूर, चौधरी कॉलनी येथील ग्रामस्थांनी १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आंदोलन करत मनपाची कोंडी केली हाेती. त्यामुळे तीन दिवस शहरात कचरा साचला होता. कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी होती. 


ऐन दिवाळीत आंदोलन सुरू झाल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी महापौर भगवान घडमोडे, विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर आदींनी शेतकरी, ग्रामस्थांकडे तीन महिन्यांची मुदत मागितली होती. बागडेंच्या मध्यस्थीने ४ महिने म्हणजे १६ फेब्रुवारीपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले होते. ही मुदत १६ जानेवारी रोजी संपत असल्याने ग्रामस्थांनी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. सभेत भाऊसाहेब गायके, विष्णू केसर, रावसाहेब चैले, नितीन वडेकर, रामेश्वर गायके, संतोष गायके, परमेश्वर वडेकर, बळीराम गायके, बाबासाहेब सोटम, पांडुरंग गायके, कृष्णा पवार, रवी भेसर, सुधाकर सोरम, डॉ. विजय डक, राजू भेसर, कल्याण वडेकर, गजानन गायके, अप्पासाहेब डक, धोंडीराम डक, राजू गायके, सुभाष चौथे, मनोज अहिरे, अप्पासाहेब गायके, बाळासाहेब गायके, परमेश्वर गायके, योगेश शेजूळ आदींसह १६० ग्रामस्थांनी निवेदन प्रशासनाला दिले. 


...तर एकही वाहन येऊ देणार नाही
कार्यवाही न झाल्याने मांडकी येथील मारुती मंदिरासमोर रविवारी ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी कचरा डेपो हटवण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर मात्र येथे कचऱ्याचे एकही वाहन येऊ देणार नाही, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. ग्रामस्थांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ही माहिती दिली. 

बातम्या आणखी आहेत...