आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलरी व्यावसायिकाच्या घरातून सात लाखांचे दागिने, रोख चोरली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील आठवडाभरापासून शहरात घरफोडे, दुचाकी चोरी व लूटमार करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. जवळपास बारा ठिकाणी चोरी झाली असून रविवारी पहाटे विष्णुनगरमध्ये दोन घरे फोडली. एका ज्वेलरी व्यावसायिकाच्या घरातून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तर दोन लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. दुसऱ्या घटनेत   साखर कारखान्याच्या माजी अधिकाऱ्याच्या घरातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाइल चोरून नेले. 

विष्णुनगरमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये पोलिस निरीक्षक तथा पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी अशोक मुदिराज यांच्या घरात ज्वेलरी व्यावसायिक प्रकाश बाबुलाल कोचेटा (४०) भाडेतत्त्वावर राहतात. त्यांचे टीव्ही सेंटर येथे सायली इमिटेशन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या पत्नी मुलांसह धोंड्याच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांना परत घेऊन येण्यासाठी कोचेटा शनिवारी सकाळी सहा वाजता घराला कुलूप लावून जनशताब्दी रेल्वेने नाशिकला गेले. रविवारी त्यांच्या शेजारच्यांच्या हा प्रकार लक्षात आला. कोचेटा परत आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने बेडरूममधील लोखंडी आणि लाकडी कपाट फोडून त्यातील २० तोळ्यांचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड लंपास केल्याचे आढळले. घटनेची माहिती पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांना देण्यात आली. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 


दोन चोर सीसीटीव्हीत कैद, ४९ मिनिटे घरात राहिले : कोचेटा यांच्या घरापासून काही अंतरावर एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराला लावलेल्या सीसीटीव्हीत दोन संशयास्पद चित्रित झाले आहेत. पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी कोचेटा यांच्या घरात शिरले. त्यानंतर ते तब्बल ४९ मिनिटांनी तेथून दोन पिशव्या घेऊन बाहेर पडल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.


 

बातम्या आणखी आहेत...