आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धैर्य, उत्साह, आशा, राेजचे हे 'सप्तरंग'; बातम्यांच्या माध्यमातून घेतलेला हा सप्तरंगांचा वेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वसंतोत्सवात होळी आणि धूलिवंदनाला मोठे महत्त्व आहे. होलिकादहनामध्ये सर्व वाईट गोष्टी व विचार नष्ट करून  होळीची पूजा केली जाते, तर दुसऱ्याच दिवशी येणाऱ्या धूलिवंदनाला सप्तरंगांची उधळण करत राग, द्वेष विसरून एकमेकांना रंग लावल्याने साहजिकच प्रेम भावनेचा उदय होतो, तर  पिचकाऱ्यांमधून उडणाऱ्या रंगांतून शीतलता मिळते.  त्यामुळे आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव हा सण करून देतो.  कारण प्रत्येक रंगाची वैशिष्ट्ये आहेत. बातम्यांच्या माध्यमातून घेतलेला हा सप्तरंगांचा वेध.


हिंगोली; वडिलांना अग्निडाग देण्याची वेळ, पण  दुःख बाजूला सारून पूजाने दिली परीक्षा  
वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेने मनावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. पण त्याचवेळी १० वी परीक्षेच्या पेपरचीही वेळ होती. या प्रसंगाला औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील पूजाने मोठ्या धैर्याने सामोरे जात मृत वडिलांच्या पायावर डोके टेकवून परीक्षा केंद्र गाठले. भोसी येथील चंपती हनवते (४७) यांचे २८ फेब्रुवारी रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उद्या होळी साजरी करायची, असा सर्वांनी निर्धार केला असतानाच त्याच रात्री  ही घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.  मृत चंपती हनवते यांची मुलगी पूजा ही  दहावीमध्ये शिक्षण घेत असून तिच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. हनवते यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्याचबरोबर पूजा हिच्या परीक्षेचीही वेळ जवळ येत होती. अंत्यसंस्कारासाठी थांबले तर परीक्षा बुडणार आणि परीक्षेला गेल्यास वडिलांचे अंत्यदर्शन मिळणार नाही, अशा द्विधा अवस्थेत पूजा सापडली. शेवटी पूजाने जड अंतःकरणाने सकाळी १० वाजता मृत वडिलांच्या  पायावर माथा टेकवून डिग्रस कऱ्हाळे येथे परीक्षा केंद्रावर जाऊन  मराठीचा पहिला पेपर  दिला.  पूजा ही लोहगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. वडिलांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर ती रात्रीच गावाकडे गेली होती. वडिलांचे निधन झाल्याचे दुःख असतानाच पूजाने मोठ्या धैर्याने दहावीची परीक्षा दिल्याने   ग्रामस्थांमध्ये दुःख, धैर्य, शोक अशा सर्व भावनांची  एकाच वेळी प्रचिती आली. 


नांदेड; नांदेडमध्ये दोन लाख शीख बांधव करणार गुलालाची उधळण 
शीख पंथात गुलाल खेळून होळी साजरी करण्याची परंपरा आहे. देशात शीख समुदायाची प्रसिद्ध होळी ही दोन ठिकाणीच साजरी होते. एक पंजाबमधील तख्त केशवगढसाहेब आणि दुसरे तख्त नांदेड येथील सचखंड श्री हुजूर साहेब. या दोन्ही ठिकाणी होळी साजरी करण्यासाठी गुलाल मोठ्या प्रमाणात वापरला जातो. नांदेड येथील गुरूद्वारात होळी साजरी करण्यासाठी दोन लाख भाविक येतात. या भाविकांना खेळण्यासाठी जवळपास एक हजार किलो गुलाल लागतो. येथील नगिनाघाट परिसरात  मोठ्या प्रमाणात गुलालाचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. नांदेडच्या तख्त सचखंड हुजूर साहेब गुरूद्वारात होळी साजरी करण्यासाठी आलेले भाविक गुलालात रंगून जातात. नांदेडमध्ये पाच दिवस होळी महोत्सव साजरा करण्यात येतो. या होळी महोत्सवासाठी दिल्ली, फरिदाबाद, पलवल, डेहराडून, जालंधर, अमृतसर, मुंबई, नागपूर, इंदौर, नागपूरसह उत्तर प्रदेशातील  सुमारे दोन लाख भाविक येतात. 


कोरड्या होळीची  ३२० वर्षांची परंपरा 
शीख पंथात जवळपास ३२० वर्षांपूर्वी दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंगजी यांनी पंजाबमधील आनंदपूर साहेब येथे तख्त केशवगढ येथे पाण्याचा वापर टाळता यावा म्हणून कोरडी होळी म्हणजेच गुलाल खेळण्याची प्रथा सुरू केली. त्या काळात झाडाच्या अर्कापासून रंग तयार करून तो रंग खेळण्यासाठी वापरत असत. तसेच पाणी किंवा चिखलही खेळला जायचा. चिखल एकमेकांच्या अंगावर टाकताना अंगावरचे कपडे फाटायचे. याबरोबरच शारीरिक इजाही होत असे. चिखलफेकीमुळे अनेकदा वाद होत असत. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन हे वैमनस्य दीर्घकाळ चालत असे. हा सर्व प्रकार पाहून श्री गुरुगोविंदसिंगजी यांनी अनुयायांना गुलालाची होळी खेळण्यासाठी प्रेरित केले. १६९९ मध्ये त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली आणि होळी साजरी करण्याचे स्वरूपच बदलून टाकले. अमृतसर आणि दिल्लीला शीख बांधवांना पाठवून गुलाल मागवून घेतला. होळीपूर्वी कीर्तन दरबाराचे आयोजन करून अनुयायांना गुलालाचे वाटप केले. पाच दिवसांची होळी साजरी करण्याची प्रथा सुरू करून होला हल्ला महल्ला मिरवणूक काढली. तीच प्रथा आजही आनंदपूर साहेब आणि नांदेडमध्ये आहे. या होळी महोत्सवाचा समारोप हल्ला महल्ला मिरवणुकीने होतो.


नळदुर्ग; परफ्युजन थेरपीनुसार प्रथमोपचार केल्याने वाचले बसचालकाचे प्राण
चालत्या एसटीत चालकाला घाम येऊन चक्कर येत असल्याचे बघून पोलिस कर्मचाऱ्याने तत्काळ परफ्युजन थेरपीनुसार प्रथमोपचार करून त्याचे प्राण वाचवले. चालत्या बसमध्ये या पोलिस कर्मचा ऱ्याने अत्यंत प्रसंगावधान बाळगत अत्यंत साहसाने चालकाला धीर देत गाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्यास सांगून त्याला तातडीने प्रथमोपचार दिले.  त्यामुळे चालकाचे आणि प्रवाशांचेही प्राण वाचवले. चालकाची हृदयक्रिया बंद पडली असती तर भीषण अपघात होऊन प्रवाशांचाही जीव धोक्यात पडला असता. ही घटना मंगळवार (२७) रात्री ९:४५ च्या सुमारास मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर ) शिवारात महामार्गावर घडली.


उमरगा आगाराची बस(क्र. एम.एच.२० बीएल २१८८) घेऊन चालक एस. ए. लोखंडे व वाहक एस. बी. कळसे हे उमरगाहून सोलापूरकडे निघाले होते. दरम्यान बस वेगात असताना चालक लोखंडे यांना घाम फुटून अचानक चक्कर आली. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटतोय की काय, या भीतीने प्रवाशांची भंबेरी उडाली. बसचा वेग कमी-जास्त होत होता. नळदुर्ग महामार्ग पोलिस ठाण्यातील हवालदार डी. बी. राठोड यांनी हा धोका ओळखून चालकाला बस कडेला थांबवायला सांगितले. चालकाला बाहेर काढून महामार्गाच्या कडेला सरळ स्थितीत झोपवून परफ्युजन थेरपी दिली.


 चालकाची धमण्यांची मालीश, छातीच्या मध्यभागी दोन्ही तळहात एकावर एक ठेवून पंपिंग केले. विशिष्ट स्थितीत सौम्य हालचाली करवून घेतल्या. यामुळे चालक लोखंडे यांचा हृदयविकाराचा झटका टळला. चालक लोखंडे यांना काही मिनिटांतच बरे वाटले. त्यानंतर ते बस घेऊन सोलापूरकडे मार्गस्थ झाले. 
 
तत्परतेमुळे वाचले प्राण
तत्परता दाखवून चालकाचे प्राण वाचवण्यासोबतच प्रवाशांनाही सुरक्षित ठेवणाऱ्या हवालदार राठोड यांचे प्रवासी व चालक लोखंडे यांनी विशेष आभार मानले. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, नुबैरला व्हायचंय बुद्धिबळातील राजा...   

बातम्या आणखी आहेत...