आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैजापूर- तालुक्यातील घायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिकेने क्लासरूममध्ये ठेवलेल्या पर्समधून एक लाख रुपयांची रक्कम गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी घडला होता. वैजापूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा पोलिस पथकाच्या भेदक नजरेने झाडात दडवून ठेवलेली रक्कम तत्परतेने हुडकून काढली.अवघ्या एका तासात आश्चर्यकारकरीत्या गायब झालेले लाख रुपये शिक्षिकेच्या हाती पोलिसांनी सोपवले.
शाळेच्या परिसरातील एका झाडाच्या मागे ही रक्कम सापडली, तेव्हा शिक्षिकेने सुस्कारा सोडला. मात्र, ही रक्कम शाळेतीलच इतर कर्मचाऱ्यांनी लांबवली होती की विद्यार्थ्यांनी, याचे कोडे अद्याप गुलदस्त्यात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर येथील आदर्श वसाहतीमधील रहिवासी विद्या विजय देशमुख या घायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी बँकेतून घरगुती कामासाठी एक लाख रुपये काढले. त्यानंतर त्यांनी ही रक्कम पर्समध्येच ठेवली. शनिवारी त्या नेहमीप्रमाणे शाळेत आल्या व ही पर्स क्लासरूममध्ये ठेवली. मात्र काही वेळानंतर पर्ससोबत कोणीतरी छेडछाड केल्याचे दिसून आले. तसेच पर्समधील एक लाख रुपयेसुद्धा गायब झाले होते. विद्या यांनी संपूर्ण शाळेत पैशांचा शोध घेतला, पण पैसे सापडले नाही. अखेर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, संतोष पवार व रज्जाक शेख यांनी शाळेला भेट देऊन तपासणी केली. या वेळी संतोष पवार व रज्जाक शेख हे दोघे शाळेच्या शौचालयाजवळ शोध घेत असताना त्यांना तेथील एका झाडाच्या मागे ही रक्कम सापडली. उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलूरकर व नांदेडकर यांनी हरवलेली रक्कम विद्या देशमुख यांच्याकडे सोपवली. तेव्हा विद्या यांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, याप्रकरणी शिक्षिकेने तक्रार न केल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.