आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचेच मंत्री रामदास कदम यांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले; अनंत गिते यांचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी शुक्रवारी औरंगाबादेत स्वपक्षीय मंत्री रामदास कदम यांच्यावर थेट हल्ला चढवला. ‘कदम यांनी मला लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गाैप्यस्फाेट त्यांनी केला. ‘ही निवडणूक माझ्यासाठी सर्वात कठीण होती. शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि आपलेच रामदास कदम अशा तिघांच्या विरोधात मी लढलो. माझीच मंडळी माझ्या पराभवासाठी टपून होती’, असा आराेप त्यांनी केला.     


शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात गिते यांनी हा गाैप्यस्फाेट करताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. ते म्हणाले, रामदास कदम यांनी मला निवडणुकीत पाडण्याचा निर्णय घेतला होता. माझ्यासाठी हा कठीण प्रसंग होता. तरीही मी जिंकलो. अाजवर लाख-दीड लाखाच्या मताधिक्याने मी चार विजय मिळवले. या वेळी मात्र मला २१०० मतांनीच विजयी व्हावे लागले. निवडणुकीनंतर भाई माझ्या कार्यालयात आले. म्हणाले, माझी चूक झाली. मी लगेच त्यांना माफ केले. कारण मी शिवसैनिक आहे. अर्थात कदम हे माझ्याकडे चुकीची माफी मागण्यासाठी नव्हे तर मुलगा योगेश याला दापोलीतून आमदार करण्यासाठी आले होते. मी त्यांना शब्द दिला अन् शपथ घेतली की मी तुमच्या मुलाला आमदार करेन. शिवसैनिकांनी झाले गेले विसरून पुढे चालले पाहिजे’, असे ते म्हणाले.     

 

उद्धव हेच महाराष्ट्रातील एकमेव परिपक्व नेते
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे हे एकमेव परिपक्व नेते असल्याचे गिते म्हणाले. राज्यात काही अतिपक्व नेते आहेत. परंतु ठाकरेंइतके परिपक्व कोणीही नाही. मोदी लाटेत शिवसेना संपेल, असे भाजपचे नेते म्हणत होते. परंतु ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि लाटेत भाजपला रोखण्याचे काम केले. यापुढेही स्वबळावर सत्ता मिळवून देऊच, असा दावा गिते यांनी केला.

 

कदम म्हणाले, ‘मला काही बोलायचे नाही’     
गिते यांच्या वक्तव्यावर रामदास कदम काय म्हणतात, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने कदम यांच्याशी संपर्क साधला.  त्यावर गिते काय म्हणाले हे त्यांनी जाणून घेतले आणि त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करायचे नसल्याचे सांगितले. ‘गिते हे आमचे नेते आहेत. त्यांच्या बोलण्यावर मला काहीही बोलायचे नाही’, एवढेच ते म्हणाले.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...