आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजारांची लाच घेणाऱ्या हवालदारास 2 वर्षे सक्तमजुरी; अदखलपात्र गुन्ह्यात घेतले पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदार ताराचंद धरमू राठोड यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 


गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील भाऊसाहेब रामभाऊ निकम यांच्याविरोधात त्यांच्या शेजाऱ्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून निकमच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याचा तपास हवालदार ताराचंद राठोड याच्याकडे देण्यात आला. कारवाई न करण्यासाठी त्याने निकम यांच्याकडे पाच हजारांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे निकम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने २९ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी सापळा रचून राठोड यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

या खटल्याची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता उदय पांडे यांनी पाच साक्षीदार तपासले. न्यायालयाने राठोड यास प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...