आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांच्या गर्भवतीची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोटात सहा महिन्यांचा गर्भ असताना एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खोकडपुरा भागात घडली. याप्रकरणी विवाहितेचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती स्वप्निल जोंधळे (वय २४, रा. खोकडपुरा) आणि सासू यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. याप्रकरणी कलम ४९८, ३०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

मंगळवारी नवरा आणि सासू कामानिमित्त बाहेर गेले असताना रूपालीने घरी गळफास घेतला. पती कामावरून घरी आला तेव्हा आतून दरवाजा बंद होता. अनेकदा दरवाजाची कडी वाजवूनही दार उघडले नाही. अखेर दार तोडले असता रूपालीने गळफास घेतल्याचे समोर आले. तिला उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रूपालीचे माहेर इंदिरानगर गारखेडा आहे. तिला सासरचे पैशासाठी त्रास देत होते, तिने फाशी घेतली नसून तिचा खून करण्यात आला असल्याचा अारोप विवाहितेचे आई-वडील आणि भावाने केला आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून पोलिस ठाण्यासमोर नातेवाइकांनी दोन तास ठिय्या मांडला होता. अकरा महिन्यांपूर्वीच १ जून २०१७ ला रूपालीचा स्वप्निल जोंधळे याच्याशी विवाह झाला होता. रूपालीची माहेरची परिस्थिती जेमतेम होती. स्वप्निल हा एका संस्थेत खासगी नोकरी करत होता. स्वप्निल आणि त्याच्या आईकडून रूपालीचा छळ केला जात होता, असे रूपालीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे, तिच्याकडे पैशाची मागणी केली जात होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या पोटात सहा महिन्यांचा गर्भही असल्याची माहिती तिच्या भावाने दिली. पोलिसांनी याप्रकरणी स्वप्निल जोंधळे आणि तिच्या आईला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे पुढील तपास करत आहेत. मंगळवारी दुपारी स्वप्निल आणि त्याच्या आईला सिडको एन-५ भागातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक अकमल शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

बातम्या आणखी आहेत...