आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीतील फसवणुकीची किंमत सरकारला मोजावी लागेल: राधाकृष्ण विखे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- राज्य आणि केंद्रातील सरकार केवळ सामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे स्वप्नरंजन करण्याचे काम करत अाहे. कर्जमाफीत केलेल्या फसवणुकीची किंमत सरकारला मोजावी लागेल. आज प्रत्येक घटक अस्वस्थ आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या योजना, तसेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद अाहे. राज्यातील या प्रश्नांबाबत आपण लवकरच राज्यपालांची भेट घेणार अाहोत, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे बोलताना सांगितले. 


श्रीगोंदे येथील डॉ. सुजय विखे यांचे संपर्क कार्यालय व जनसेवा फाउंडेशनच्या कार्यालयाच्या उद््घाटनप्रसंगी विखे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, सुभाष डांगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, राजू गोरे, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर, अनिल वीर, बाळासाहेब मोहरे, हेमंत ओगले, दादासाहेब साबळे आदी उपस्थित होते. 


यावेळी बोलताना विखे यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकार केवळ स्वप्नरंजन करत असल्याचे सांगितले. कर्जमाफीत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्याची किंमत त्यांनी मोजावी लागेल. सरकारने जनतेमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे. याचसाठी सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून सुरू केली. या निवडणुकीसाठी लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. गावोगावच्या राजकारणात गट पडत आहेत, अशी टीका विखे यांनी केली. 


सुजय विखे यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्य जनतेची कामे होणार आहेत. आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाणार आहे. सुजय यांचे हे काम सकारात्मक आणि लोकाभिमुख पाऊल ठरेल, असे विखे म्हणाले. 


आमदार राहुल जगताप म्हणाले, डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदे मोठी जबाबदारी घेणार आहे. आपणही मनात शंका आणू नका. पुढची निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे. याबाबत नेते एकत्र बसून निर्णय घेतील. मिळेल ती भूमिका आपण पार पाडू, असे सांगत विखे यांनी सर्वांना एकत्र आणले असल्याचे जगताप यांनी नमूद केले. 


मी सामान्य जनतेची कामे करणार ... 
जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्य जनतेची कामे केली जातील. रेशनकार्ड उपलब्ध करून देणे, निराधारांना संजय गांधी योजनेची प्रकरणे करण्यासाठी मदत, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांना मार्गदर्शन करणे, तसेच आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...