आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- संभाजीनगर असे शहराचे नामकरण करण्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री रामदास कदम यांनी खा.चंद्रकांत खैरे यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. केंद्रात प्रस्ताव गेलेला आहे तर मग त्यांनी तेथे पंतप्रधानांना भेटावे, ते ऐकत नसतील तर वेलमध्ये (हौद्यात) बसावे, असा सल्ला देतानाच या मुद्द्यावरून खा. खैरे हे उगाच साप साप म्हणत भुई धोपटताहेत, अशा शब्दांत टीका केली.
शहराचे नाव बदलण्यासाठी शिवसेनेचे मंत्रीही काहीच करत नसल्याचा आरोप खैरे यांनी केल्यानंतर या मुद्द्यावरून दोघांत जोरदार सुंदोपसुंदी सुरू आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या खैरेंनी दिल्लीत काय केले, असा सवाल कदम यांनी केला होता. तेव्हापासून कदम जेव्हा जेव्हा शहरात येतात तेव्हा खैरे यांना टोला मारण्याची संधी सोडत नाहीत. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हाही कदमांनी संधी साधली. हा प्रस्ताव दिल्लीत आहे, तेथे खैरे यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी, ते वेळ देत नसतील किंवा बोलू देत नसतील तर दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणावा. परंतु ते तसे करत नाहीत. उगाच साप साप म्हणत भुई धोपटत असल्याची टीका केली.
आधी टीका, नंतर म्हणाले, भांडण लावू नका
पालकमंत्री कदम यांनी प्रथम खैरे यांच्यावर टीका केली. पत्रकारांकडून पुन्हा प्रश्न आला असता, तुम्ही आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करताहात. आम्ही चांगले मित्र आहोत, तुम्ही आमच्यात भांडण लावू नका, अशी विनंती असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.