आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा धान्य घोटाळा: सुरगाण्यात 350 क्विंटल तांदळाची खुली विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बहुचर्चीत रेशन धान्य घोटाळ्याने राज्यभर गाजलेल्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा तशाच प्रकाराची पुनरावृत्ती झाली अाहे. पण हे धान्य रेशनचे नसून आदिवासी विकास महामंडळाचे आहे. आधारभूत आणि एकाधिकारी योजनेंतर्गत महामंडळाने खरेदी केलेला आणि सुरगाण्यातील हातरुंडी येथील गोदामात ठेवलेला ३५० क्विंटल तांदूळ परस्पर खुल्या बाजारात विकण्यात अाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यावर प्रादेशिक व्यवस्थापकांनी चौकशी समिती नेमली असून, त्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 


महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी हमीभावाने धान्य खरेदी केले जाते. एकाधिकार आणि आधारभूत योजनेंतर्गत हे धान्य खरेदी केले होते. हे धान्य महामंडळाच्या तसेच सहकारी संस्थांच्या गोदामांमध्ये ठेवले जाते. त्याच अंतर्गत यंदा महामंडळाने खरेदी केलेला ३५० क्विंटल तांदूळ सुरगाण्यातील हातरुंडी येथील गोदामात ठेवला हाेता. 


त्याची भरड करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यांची परवानगी मिळताच तो भरडीसाठी गिरणीत पाठवित त्यातून तांदूळ काढला जाणार होता. त्यानंतर त्याची विक्री रेशनवर केली जाणे अपेक्षित होते. परंतु, ही प्रक्रिया सुरू असतानाच शासनाच्या पैशाने खरेदी केलेला हा सर्व माल हातरुंडीच्या गोदामातून खुल्या बाजारात विकल्याचा प्रकार उघडकीस अाला. लाखाे रुपयांच्या या अपहारामुळे प्रादेशिक स्तरावरील यंत्रणा चांगलीच खडबडून जागी झाली अाहे. 


खुल्या बाजारात तांदूळविक्री कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त केली असून एक-दोन दिवसांत समिती अहवाल सादर करेल. शिवाय यात जबाबदार असलेल्या गोदामपालासह इतरही व्यक्तींचा खुलासा मागितला आहे. चौकशी अहवाल आणि खुलासा आल्यानंतर त्यातून आलेल्या तथ्थ्यांनुसार पुढील कारवाई केली जाईल. 
- एस. एस. संभारे, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ 

बातम्या आणखी आहेत...