आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरेगाव, लासूरच्या गोदामावर छापा; 24 लाखांचा गुटखा जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूरस्टेशन / औरंगाबाद- ग्रामीण भागात राजरोसपणे गुटखा, सुगंधी तंबाखू विकणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या घरातील गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेने पहाटे छापा मारला. शिरेगाव आणि लासूर स्टेशन येथे ही गोदामे होती. १ फेब्रुवारी पहाटे ५ वाजताच पथकाने दोन्ही ठिकाणी धाड टाकत तिघांना ताब्यात घेतले. या पथकाने २४ लाख रुपये किमतीचा गुटखा, हिरा आणि रॉयल तंबाखू जप्त केली. हे गोदाम कल्पेश भारत सोनी (२२, रा. लासूर स्टेशन) याच्या मालकीचे असून त्याच्या वडिलांमार्फत हा प्रकार सुरू होता, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग यांनी सांगितली. 


अनेक महिन्यांपासून सिल्लेगाव हद्दीतील लासूर स्टेशन व शिरेगाव येथून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेला याची खबऱ्याने माहिती दिल्यानंतर धाड टाकण्याचे प्रयत्न सुरू हाेते. १ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलिसांच्या दोन पथकांनी धाडी टाकल्या. यात शिरेगाव येथे राहणारे दादासाहेब लक्ष्मण कऱ्हाळे यांच्या घरात हिरा गुटख्याच्या ३८, तर रॉयल तंबाखूच्या १९ गोण्या मिळाल्या. याची बाजारातील किंमत अनुक्रमे ४ लाख १८ हजार आणि १ लाख ७१ हजार रुपये आहे. याच गावातील दिनेश कैलास गोटे याच्या घरातून गुटख्याच्या ३ लाख ७४ हजारांच्या ३४ गाेण्या आणि १ लाख ५३ हजार रुपयांच्या १७ गोण्या आढळून आल्या. दुसऱ्या कारवाईत लासूर स्टेशन येेथे सलीम जाहेद बेग याच्या घरासह व घरासमोर उभ्या टाटा एस पिकअप व्हॅनमध्ये गुटख्याच्या गोण्या होत्या. हिरा गुटख्याच्या ७ लाख ४८ हजार रुपयांच्या ६८ गाेण्या, २ लाख ७९ हजार रुपयांच्या रॉयल टोबॅकोच्या ३४ गोण्या आणि ७२ हजार रुपयांच्या हिरा गुटख्याच्या ७ गोण्या जप्त करण्यात आल्या. तसेच पिकअप व्हॅनही जप्त करण्यात आली. 


पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक बी. जी. दुलत, व्ही. जी. जाधव, सहायक फौजदार गफार पठाण, गणेश जाधव, वसंत लटपटे, हवालदार विठ्ठल राख, विक्रम देशमुख, रंगराव बावस्कर, संजय काळे, रतन वारे, नवनाथ कोल्हे, पोलिस नाईक रमेश अपसनवाड, संजय भोसले, आशिष जमधडे, राहुल पगारे, सागर पाटील, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगिता थोरात, सुरेखा वाघ, पुष्पांजली इंगळे, रजनी सोनवणे यांचा पथकात सहभाग होता. 


हा साठा इतरांचा, आम्ही केवळ सांभाळला 
पोलिसांनी कऱ्हाळे, गोटे आणि बेग यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. गुटखा, तंबाखूचा हा साठा आमचा नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. परंतु ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांची नावे पोलिसांकडे होतीच. त्यापैकी नावे विचारली असता हा सर्व ऐवज लासूर स्टेशनचा किराणा व्यापारी कल्पेश भारत सोनी याचा असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनीही यास दुजोरा दिला. परंतु कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन विभागास असल्याने पोलिसांनी सर्व ऐवज व तिघांना त्यांच्या हवाली केले. 


सात महिन्यांतील आठवी कारवाई 
शहर पोलिसांच्या तुलनेत स्थानिक गुन्हे शाखा गुटखा, तंबाखू तसेच इतर अवैध धंद्याविरोधात कारवाई करताना दिसत आहेत. सात महिन्यांत स्थानिक गुन्हे शाखेने आठ ठिकाणी धाडी टाकत गुटखा, सुगंधी तंबाखू विकणाऱ्यांवर कारवाई केली. यात पैठण, खुलताबाद, सोयगाव, गंगापूर, बिडकीन, अजिंठा, गंगापूरत तालुक्यातील शिल्लेगाव आदी गावांचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...