आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- एमआयटी महाविद्यालयातील प्राध्यापक राहुल प्रदीप अग्रवाल यांचे द्वारकानगर (बन्सीलालनगर) येथील घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचे दागिने पळवले. ते सहा दिवसांसाठी दिल्ली येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. रविवारी (११ फेब्रुवारी) तेथून परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांना फोडता येणार नाही असे खास कपाट त्यांनी दिल्लीहून आणले होते. मात्र, चुकीने त्यांच्याकडून कपाटालाच त्याची किल्ली राहून गेली. त्यामुळे चोरट्यांचे फावले.
अग्रवाल यांच्या वडिलांचे शहागंज येथे मोठे कपडे विक्रीचे दुकान आहे. ४ फेब्रुवारी रोजी त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला विवाह सोहळ्याला गेले होते. याची माहिती असलेल्यांनीच हात साफ केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अग्रवाल यांचे स्वयंपाकघर बंगल्याच्या मागील बाजूला आहे. तेथील एक गज कापून चोरटे आत शिरले.
एका लॉकरला चावी नव्हती
स्वयंपाक खोलीच्या शेजारील एका बेडरूमला कुलूप होते. चोरट्यांनी स्क्रू ड्रायव्हर, टॉमीने लॅच लॉकची बाजू उकरून दरवाजा उघडला. तेथे अत्यंत सुरक्षित मानले जाणारे कपाट होते. पण अग्रवाल त्याला चावी तशीच ठेवून गेले होते. यातील एका लॉकरमध्ये सोन्याचे तर दुसऱ्यात चांदीचे दागिने होते. चोरट्यांनी किल्लीने एक लॉकर उघडून चांदीचे दागिने घेतले, तर चावीच्या जुडग्यात दुसऱ्या लॉकरची चावी त्यांना सापडली नाही. म्हणून त्यांनी ते लॉकर टॉमीने तोडले. त्यातून १४ तोळ्यांचे दागिने काढले.
दारासमोर वर्तमानपत्रांचा ढीग आणि धूळ
अग्रवाल यांनी आपण गावी जाणार असल्याचे वर्तमानपत्र टाकणाऱ्यालाही सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांच्या दारासमोर वर्तमानपत्रांचा ढीग पडला. दारावर धूळही साचली होती. शिवाय दागिने ठेवलेल्या कपाटाची चावीही काढून ठेवली नव्हती. यामुळे चोरट्यांना आयते कोलीत मिळाले.
ना सीसीटीव्ही, ना गावाला जाण्याची पोलिसांना पूर्वकल्पना
बाहेरगावी जाण्यापूर्वी नजीकच्या पोलिस ठाण्यात नोंद करावी, असे पोलिसांचे कायम आवाहन असते. परंतु अग्रवाल यांनी अशी कुठलीही नोंद वेदांतनगर पोलिस ठाण्यात केली नव्हती. हा प्रकार लक्षात घेऊन नागरिकांनी नोंद करावी. म्हणजे गस्त वाढवता येते, असे पोलिस निरीक्षक अनिल आडे म्हणाले.
गज चिकटवून परत गेले
अग्रवाल यांच्या बंगल्याशेजारी एका इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने तेथे मातीचा मोठा ढिगारा होता. त्यावर उभे राहून चोरांनी खिडकीचा गज करवतीने कापला. ऐवज घेऊन ते याच मार्गाने बाहेर पडले. परंतु, कापलेला गज नंतर दिसू नये म्हणून अग्रवाल यांच्या घरातीलच चिकटपट्टी वापरून गज व्यवस्थित चिकटवला होता. हा प्रकार पाहून क्षणभर पोलिसही आश्चर्यचकित झाले.
अल्पवयीन चोरांचा दाट संशय
काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेने अल्पवयीन चोरांची टोळी ताब्यात घेतली होती. रेल्वेस्थानक रस्त्यावर द्वारकापुरी कॉलनीजवळ एका पतसंस्थेच्या कॅमेऱ्यात अंधुक अल्पवयीन मुले रात्री फिरताना कैद झाली आहेत. तसेच खिडकीचा गज कापून आत शिरणारे अंगकाठीने बारीक आणि अल्पवयीन असल्याचा संशय आहे.
साडेचार लाखांचे दागिने, सव्वा लाखाची रोख रक्कम लंपास
रोकडही पळवली : दागिने घेतल्यावर चोरट्यांनी पलंगाकडे नजर वळवली. पलंगाखालील एका एअर बॅगला लावलेले कुलूप तोडण्याऐेवजी बॅग फाडून त्यातील १ लाख २५ हजार रुपये घेतले. इतर कपडे, सामान अस्ताव्यस्त फेकून दिले.
श्वान जागीच घुटमळले
गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक अनिल आडे, सपोनि. घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोन-तीन दिवसांपूर्वीच चोरी झाली असल्याने श्वानही जागीच घुटमळले.
सीसीटीव्ही नाही
द्वारकानगरात उच्चभ्रू वस्ती असूनही तेथे किंवा बंगल्यामध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे पोलिसांना आता रेल्वेस्थानक रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.