आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल व्हॅनचालकाचे शाळकरी मुलीशी 3 महिन्यांपासून गैरकृत्य, औरंगाबादेतील धक्‍कादायक प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आठवीत शिकणाऱ्या तेरावर्षीय मुलीला रोज शाळेत ने-आण करणारा स्कूल व्हॅनचा चालकच ब्लॅकमेल करून तिच्याशी गैरकृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक दिवस ही मुलगी व्हॅन चालकासोबत जात असल्याचे ट्यूशनच्या शिक्षिकेने पाहिल्यानंतर या गैरकृत्याचे बिंग फुटले. याप्रकरणी व्हॅनचालक श्रीकांत सोनवणे (३५) याला हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, एका मुलीच्या तक्रारीनंतर याच व्हॅनमधील अन्य तीन मुलींशीही त्याने अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.

 

नीना (नाव बदलले आहे) सध्या इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेत आठवीत शिकते. सहावीपासूनच ती सोनवणेच्या स्कूल व्हॅनमध्ये शाळेत ये- जा करत होती. चार- पाच महिन्यांपूर्वी सोनवणेची वाईट नजर तिच्यावर पडायला सुरुवात झाली. अनेकदा तो नीनाला व्हॅनमध्ये त्याच्या शेजारच्या सीटवर बसायला सांगू लागला. परंतु नीना टाळत राहिली. याच दरम्यान एकेदिवशी त्याने नीनाला घरी सोडताना अचानक तिचा हात पकडला आणि रडायला लागला. तू समोर बसली नाहीस तर मी मरून जाईन, असे म्हणून तिला बळजबरी शेजारच्या सीटवर बसायला भाग पाडले. त्यानंतर जेव्हा जेव्हा नीना त्याच्या शेजारी बसायची तेव्हा सोनवणे तिच्याशी लगट करायचा. यानंतर नाही करणार, असे म्हणत तो वारंवार असे प्रकार करू लागला.

 

६ मार्च रोजी तो अचानक नीनाच्या ट्यूशनसमोर जाऊन उभा राहिला आणि तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. ७ मार्च रोजी ट्यूशन संपल्यानंतर तिला घरी सोडण्याचे कारण पुढे करून पुन्हा घेऊन गेला. ट्यूशनच्या शिक्षिकेने हे पाहिले. संशय आल्याने शिक्षिकेने तत्काळ नीनाच्या आईला कॉल करून नीना घरी आली का, तुम्ही तिला ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅन लावली का, असे विचारले. काही तरी गडबड आहे, असे लक्षात येताच आईने सोनवणेला काॅल करून नीनाला तुम्ही घेऊन गेला का, असे विचारले. नीना घरी गेल्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. नीनाला घेऊन आईने हर्सूल ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत सोनवणेला लगेच अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक सरला गाडेकर करत आहेत.

 

व्हॅनवर महिला कर्मचारी नाही
नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, व्हॅनवर चालकाव्यतिरिक्त महिला कर्मचारी असणे अनिवार्य आहे. अनेक शाळांच्या बसमध्ये महिला कर्मचारी पाहायला मिळतात. परंतु खासगी व्हॅनमध्ये असे कुठलेही कर्मचारी नसतात किंवा त्यांची जबाबदारीही कोणी घेत नाही. त्यामुळे असे प्रकार घडतात.

 

व्हॅनचालक दोन मुलींचा बाप
सोनवणे विवाहित असून दोन मुलींचा बाप आहे. नीनाच्या आईने तक्रार केल्यानंतर त्याने असेच कृत्य अन्य तीन मुलींसोबत केल्याचे समोर आले. बदनामी, भीतीपोटी पालक किंवा मुलगी समोर येत नाही. त्यामुळे अशांचे फावते आणि हिंमत वाढते. सोनवणेची चौकशी सुरू असून तक्रारी आल्यास सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल करू, असे कल्याणकर म्हणाले.

 

फोटो व्हायरल करण्याची धमकी
व्हॅनचालक साेनवणेने नीनाला मी तुुझी छायाचित्रे काढली आहेत. तू माझ्यासोबत आली नाहीस किंवा हा प्रकार घरी सांगितला तर तुझी छायाचित्रे सगळ्यांना दाखवीन, व्हायरल करीन, असे धमकावून आजच्याच दिवस ये, असे म्हणत त्याने नेहमीच असे प्रकार करण्यास सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...