आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरवल्याने करपली शिवसेना-काँग्रेस अन् राष्ट्रवादीची भाकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेली ३० वर्षे औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात लढणारा पक्ष अशी प्रतिमा केली. काँग्रेसचा पाठिराखा असलेला मुस्लिम समाज तर सेनेचे प्रमुख टार्गेट राहिला. त्या आधारावरच विजय खिशात घातले. दुसरीकडे शिवसेनेच्या जातीवादाला रोखण्याची शक्ती केवळ आमच्यात असे काँग्रेसकडून सांगितले. प्रत्येक निवडणुकीत असाच प्रचार करून मतपेटी पक्की केली. 


राष्ट्रवादीचे धोरणही काँग्रेसपेक्षा वेगळे राहिले नाही. तरीही या तिन्ही पक्षांनी फुलंब्री नगरपंचायतमध्ये भाजपच्या विरोधात आघाडी केली. एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर ती बदलली पाहिजे. भाकरी फिरवली तर करपत नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नेहमी सांगतात. त्यानुसार या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाकरी फिरवली. पण ती मतदारांच्या पचनी पडली नाही. लोकांना काय वाटते, हे समजून घेऊन पावले टाकण्याचे शहाणपण त्यांनी दाखवले असते तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. 


विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची फुलंब्री कर्मभूमी आहे. शिवाय आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांचाही येथे वावर आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते. 


हिरवा कंदील डोक्यावर 
जिल्हा परिषदेतील पैटर्न नगर पंचायतमध्येही वापरण्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवत मातोश्रीवरून हिरवा कंदीलही मिळवला. भाजप विरोधासाठी सत्तार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी हिरवा कंदील डोक्यावर घेतला. पण ही मोर्चेबांधणी केवळ सेनेसाठीच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी आत्मघातकी हल्ला स्वत:वरच उलटल्यासारखी झाली. 


शिरसाठांना आधीच हेरले 
माळी आणि मुस्लिम समाजाचे मोठे मतदान असलेल्या फुलंब्रीत पुढे चालून माळी समाजाचा तरुण आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता असणारा नेता आपल्याला गरजेचा आहे, हे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तीन वर्षांपूर्वीच राष्ट्रवादीचे सुहास शिरसाट यांना सोबत घेतले. त्यानंतर सातत्याने त्यांना बळ देऊन तेच भावी नेतृत्व असेल, असे मतदारांच्या मनावर ठसवले. 


नेमकी भूमिका काय

सेनेच्या मुस्लिम विरोधाचे काय होणार. नेहमी भगवा ध्वज, घेऊन फिरणारे शिवसैनिक राजकारणासाठी भगवा रंग कसा विसरू शकतात, असे हिंदुत्ववादी मतदार विचारत होते, तर जातीवादी सेनेला नष्ट करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका कशी बदलू शकते, असा मुस्लिमांचा सवाल होता. अखेरच्या टप्प्यात रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे यांनीही सर्व ‘अर्था’ने तळागाळापर्यंत मतदारांपर्यंत शक्ती पोहोचवली. हातभार लावला. 

बातम्या आणखी आहेत...