आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातनंतर महाराष्ट्राचा शेतकरी भाजपला अद्दल घडवेल : उद्धव ठाकरे यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- केवळ हिंदू मते फुटू नयेत म्हणून तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी भाजपशी युती केली. मात्र आता तेच आमच्या घरात घुसत आहेत. २५ वर्षे युती जपली, आता शिवसेना एकटे लढणार अाहे, असा पुनरुच्चार करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. गुजरातच्या शेतकऱ्यांनी भाजपला अद्दल घडवली. अशीच अद्दल महाराष्ट्रातील शेतकरी भाजपला घडवतील, इसा इशाराही त्यांनी दिला.


पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, आपले पंतप्रधान घोषणाबाज आहेत. किती योजनांच्या त्यांनी घोषणा केल्या त्यांची नावेही आज आठवत नाहीत. म्हणे आम्ही २०२२ मध्ये कामे करू. त्यांना आता जागा दाखवा. आम्ही तुमच्याबरोबर सत्तेत असलो तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी जी योग्य भूमिका असेल तीच घेतो.  कर्जमाफीचे मोसमावर मोसम येत आहेत. आणखी किती मोसम लागणार आहेत? आज एक-दोनच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली. पूर्ण कर्ज कधी माफ होणार, असा सवाल करीत उद्धव यांनी शिवसेना कधीही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सूचित केले. 

 

थापाड्या सरकारला जागा दाखवून देऊ 

भाजपने या वर्षी पाकमधून साखर आयात केली. आम्हाला फक्त पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नका, असे सांगतात. याच मंडळीने त्या वेळी तुरीचे उत्पादन वाढणार असे माहीत असतानादेखील तूर आयात केली. आता बोंडअळीचे पंचनामे घोड्यावरून केले. शेतकऱ्यांना मदत कधी देणार, असा सवाल करत उद्धव यांंनी कर्जमाफीसारखी फसवणूक करणार का, असा प्रश्न केला. यापुढे या थापाड्या सरकारला जागा दाखवू, असा इशाराही उद्धव यांनी दिला.

 

पंधरा वर्षे सत्तेत राहून डल्ला मारला, आता हल्लाबोलचा काय अधिकार? 
घनसावंगी :
पंधरा वर्षांपर्यंत सत्तेत राहून ‘डल्ला मारून गल्ला भरवणाऱ्यांना’ आता इतरांवर हल्लाबोल करण्याचा अधिकार नाही, असा टोला मारत शिवसेनेला शेळी आणि कासव म्हणणारा बिनशिंगाचा व बिनाशेपटीचा माणूस आम्हाला शहाणपणा शिकवतोय, अशा शब्दांत उद्धव यांनी येथे अजित पवार यांच्यावर टीका केली. सत्तेत असो अथवा नसो, अन्याय-अत्याचाराविरुद्ध व शेतकऱ्यांसह अनेक प्रश्नांसाठी शिवसेनाच कायम रस्त्यावर उतरत असते. फक्त तुम्ही शिवसेनेसोबतच राहा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी  येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना केले.

 


शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्यामुळेच : शरद पवारांवर टीका
‘दिल्लीत तुमचे सरकार होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल करून आज शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्यामुळेच आहेत,’ अशी टीका उद्धव  यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. घनसावंगी येथे शेतकरी मेळाव्यात ते म्हणाले, पंधरा वर्षापर्यंत सत्तेत राहून डल्ला मारून गल्ला भरवणाऱ्यांना कुणाविरुद्ध आता हल्लाबोल करण्याचा अधिकारच नाही. अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. 

बातम्या आणखी आहेत...