आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूमची जाळी तोडून दुकानातील दीड लाख चोरले, दंगलीदरम्यान साफ केला हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दंगलीदरम्यान जुना मोंढा बंद असल्याने नियमित बिलाची रक्कम दुकानात ठेवणे किराणा व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. चोरांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावरील बाथरूमच्या जाळीचे गज वाकवून आत प्रवेश करत रोख दीड लाख रुपये चोरून नेले. छावणी परिसरातील शेख रेहमान शेख हाफिज यांच्या दुकानात हा प्रकार घडला. 


रेहमान यांचे दाणा बाजारामध्ये समीर किराणा स्टोअर्स आहे. शहरात उसळलेल्या दंगलीमुळे मागील पाच ते सहा दिवस जुना मोंढा बंदच होता. त्यामुळे बिलाचे १ लाख ६० हजार रुपये देणे बाकी होते. ही रक्कम दुकानातच ठेवली होती. १९ मे रोजी मध्यरात्री त्यांच्या किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीचे गज वाकवून चोरांनी आत प्रवेश केला. काउंटरजवळील कापडी पिशवीत ठेवलेले पैसे चोरून नेले. रेहमान यांनी २१ मे रोजी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक सचिन मिरधे तपास करत आहेत. 


रामनगरमध्ये घर फोडून ३६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
रामनगर येथील सदाशिव नगरमध्ये चोरांनी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घराचे कुलूप तोडून ३६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सुनील माणिक दराडे हे १४ ते २० मे दरम्यान कुटुंबासह गावाला गेले होते. या दरम्यान चोरांनी कुलूप तोडून कपाटातील पाच हजार रोख आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...