आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
तब्बल १२ वर्षांपासून अमेरिकेत मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणाऱ्या धुळ्यातील हर्षल विभांडिक या अत्यंत सकारात्मक असलेल्या तरुणाची ही कहाणी आहे. त्याने स्वत:चे पैसे आणि लोकसहभागातून दीड वर्षात ७.५ कोटी रुपये जमवून जिल्हा परिषदेच्या सर्वच म्हणजे तब्बल ११०३ शाळा डिजिटल केल्या आहेत.
धुळ्यातील कापड दुकानात ३८ वर्षांपासून सेल्समन असलेल्या सुभाष विभांडिक यांचा मुलगा हर्षलचे जयहिंद मराठी स्कूलमध्ये शिक्षण झाले. त्या वेळी त्यांची परिस्थिती जेमतेमच होती. पुढे मुंबईत यूडीसीटीमध्ये बीटेकला (केमिकल इंजिनिअरिंग) नंबर लागला. २००२ मध्ये पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याकरिता प्रवेश परीक्षा शुल्क भरण्यासही पैसे नव्हते. मग त्यांनी ४ वर्षे गुजरातमध्ये नोकरी करून पैसे जमा केले. २००६ मध्ये न्यूयॉर्कच्या पेस युनिव्हर्सिटीत एमबीए फायनान्स मॅनेजमेंटला प्रवेश घेतला. २००८ मध्ये लगेच एका बहुराष्ट्रीय कंपनीत बँकर म्हणून नोकरी लागली. नोकरी करताना घरची ओढ लागली. आपल्या गावासाठी काही करावे असे वाटू लागले. २०१० मध्ये इंटरनॅशनल कॅपिटल पार्टनर या कंपनीत भारतातून काम करण्याची परवानगी मिळेल या अटीवर नोकरी स्वीकारली. हर्षल यांनी २०१४ मध्ये ३ महिने सुटी काढून १६ खेडे पालथे घातले. कंपनीला सांगीतल्याप्रमाणे ३ महिने भारतात तर ३ आठवडे अमेरिकेत काम करण्याची परवानगी घेऊन सप्टेंबर २०१५ मध्ये सहकुटुंब धुळे गाठले.
२५० प्रेरणासभांतून जागृती
गावकऱ्यांना सोबत घेण्यासाठी हर्षल यांनी केंद्रप्रमुख, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक अन् ग्रामस्थांच्या प्रेरणासभा असे नाव देऊन बैठकांवर भर दिला. त्यात मुलांना शाळेत पाठवायचे, वर्गणीचे आवाहन केले. दीड वर्षात २५० सभा झाल्या.
राज्यात धुळे मॉडेल
शिक्षण खात्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या सूचनेवरून हर्षल यांनी बालेवाडी (पुणे) येथे जि.प.चे मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या बैठकीत योजनेचे सादरीकरण केले. त्यानंतर राज्यातील ६७ हजार जि. प. शाळांपैकी ६१ हजारांवर डिजिटल झाल्या.
शिक्षकांचे सव्वा कोटी
देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशन, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्यांनी योजनेसाठी ७ कोटी २५ लाख रुपये दिले. त्यातील १.२५ कोटी शिक्षकांचे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.