आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉपी करू द्या, अन्यथा मी आत्महत्या करतो! परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नोकरीसाठी ३५ लाख रुपये भरले आहेत. मला ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे. त्यामुळे कॉपी करू द्या, अन्यथा कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतो, अशी धमकी देत भावी गुरुजी पळत सुटला. हा प्रकार पाहून शिक्षकांची घाबरगुंडी उडाली. कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढून वर्गात बसवल्यानंतर शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा प्रकार शनिवारी नवखंडा येेथील डॉ. रफिक झकेरिया काॅलेज फॉर वुमन येथील परीक्षा केंद्रावर घडला. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सध्या बीएडच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. सकाळी १० ते ११.३० या वेळेत विज्ञान विषयाचा पेपर होता. पेपर सुरू होऊन दहा मिनिटे होताच एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला. पर्यवेक्षकांनी कॉपी जप्त करून उत्तरपत्रिका ताब्यात घेतली. तेव्हा चिडलेल्या विद्यार्थ्याने माझा पेपर परत द्या, नसता मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत तो वर्गाबाहेर पळत सुटला. यामुळे घाबरलेल्या महिला कर्मचारी आणि पर्यवेक्षक त्याच्या मागे पळाले. तो दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर त्याची समजूत काढत तुझा पेपर परत देतो, तू वर्गात येऊन बस, असे सांगत पेपर परत दिला. कॉपी ताब्यात घेऊन त्याला उर्वरित पेपर लिहू दिला. 


या सर्व प्रकारामुळे संपूर्ण हॉलमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कॉलेज प्रशासनाने ही माहिती विद्यापीठाला कळवली. तसेच पोलिसांनाही तक्रार अर्ज दिल्याचे प्राचार्य डॉ. मजहर फारुकी यांनी सांगितले. 


कॉपी पकडल्याने केला गोंधळ 
वर्ग क्र. ३ मध्ये एक विद्यार्थी कॉपी करताना दिसला. आम्ही तत्काळ त्याचा पेपर ताब्यात घेतला. त्यामुळे आरडाओरड करत त्याने आत्महत्येची धमकी दिली. अशा प्रकारांमुळे परीक्षा कशा घ्यायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे केंद्रप्रमुख डॉ. विद्या प्रधान आणि सहकेंद्रप्रमुख डॉ. वी. रा. मोरे म्हणाले. 


एमआयटीत केली हाेती आत्महत्या 
बीड बायपासवरील एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातील सचिन सुरेश वाघ या विद्यार्थ्यानेही कॉपी पकडल्यामुळे १० एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने शिक्षकांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...