आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100% कचरा उचलण्याचा कृती आराखडा सादर करा; मुख्य सचिवांचे महापालिका प्रशासनाला आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पुढील सहा दिवसांत शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा शंभर टक्के उचलण्यासाठी तुमच्याकडे असलेला कृती आराखडा सादर करा, असे आदेश राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. आपण तीनच दिवसांत हे काम करू शकू, असे प्रशासनाला वाटल्याने तीन दिवसांचा कृती आराखडा तयार करून बुधवारी सकाळीच तो करीर यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. 


महापौर नंदकुमार घोडेले यांनी रस्त्यावरचा कचरा उचलण्याच्या कामाला गती देण्यासाठी उपअभियंता एम.बी. काझी यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची समिती गठित केली. यात उपअभियंता एस.एस. कुलकर्णी, के.बी. देशमुख, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांचा समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत शहरातील रस्ते कचरामुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्याचा घोडेले यांनी चांगलाच धसका घेतला आहे. दुसरीकडे प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी मंगळवारी प्रधान सचिव करीर यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत करीर यांनी कचरा नियोजनाचा कृती आराखडा तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. याबाबत घनकचरा विभागाचे प्रमुख विक्रम मांडुरके यांनी सांगितले की, तीन दिवसांत रस्त्यांवरील शंभर टक्के कचरा उचलण्याचा कृती आराखडा तयार केला जात आहे. तो उद्यापर्यंत शासनाकडे सादर केला जाईल. 


आज तीन ठिकाणी बसवणार श्रेडींग मशीन 
बायोकेमिकलची प्रक्रिया झालेल्या कचऱ्याचे बारीक तुकडे करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणाऱ्या तीन श्रेडिंग मशीन झाल्टा, रमानगर आणि मध्यवर्ती जकात नाका येथे बसवल्या जाणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. एन्व्हायरो बायोटेक ही नाशिकची कंपनी बुधवारी या मशीन शहरात घेऊन येत आहे. यापूर्वी या कंपनीने एक स्क्रीनिंग मशीन जकात नाक्यावर बसवले आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळे करण्याचे काम ही मशीन करते. 

बातम्या आणखी आहेत...